For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉस्पिटल्स-हॉटेल्सकडून कचरा शुल्क, दंड वसूल

03:16 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
हॉस्पिटल्स हॉटेल्सकडून कचरा शुल्क  दंड वसूल
Advertisement

विजया-कसबेकर मेटगूड हॉस्पिटल, आदर्श पॅलेस हॉटेलवर कारवाई :  विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचेही धाबे दणाणले 

Advertisement

बेळगाव : अयोध्यानगर येथील विजया हॉस्पिटल,शिवाजीनगर येथील कसबेकर मेटगूड या दवाखान्यांकडून घनकचरा व्यवस्थापन शुल्क आणि दंड असे एकूण प्रत्येकी 36 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. कॉलेज रोडवरील आदर्श पॅलेसकडून कचरा व्यवस्थापन शुल्क म्हणून 27 हजार रुपये वसूल करण्यासह 2028 पर्यंत त्यांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच व्यापार परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून दोन आस्थापनांना 5256 रुपयाचे चलन देण्यात आले आहे. महापालिकेने गुरुवार दि. 26 रोजी केलेल्या या कारवाईमुळे कचरा व्यवस्थापन शुल्क थकविलेल्या, विना व्यापार परवाना आणि नूतनीकरण न केलेल्यांना धक्का दिला आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून खुल्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरूच ठेवण्यात आला आहे. ज्यावेळी महापालिकेकडून व्यापार परवाना दिला जातो, त्याचवेळी संबंधितांकडून घनकचरा व्यवस्थापन शुल्कदेखील आकारले जाते. मात्र शहर व उपनगरातील बहुतांश व्यावसायिकांनी महापालिकेकडून व्यापार परवाना घेण्यापूर्वीच व्यवसाय सुरू ठेवले आहेत. ज्यांच्याकडे व्यापार परवाना आहे, त्यापैकी अनेक जणांनी त्याचे नूतनीकरण केलेले नाही. महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन शुल्क भरणे आवश्यक आहे.

Advertisement

कारण संबंधितांचा कचरा महापालिकेकडून उचल केला जातो. पण काही जणांकडून कचऱ्याचे शुल्कदेखील भरले जात नसल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यापूर्वी शहरातील काही हॉस्पिटल्सवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला होता. मेडिकल वेस्ट रस्त्याच्या कडेला टाकल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच दोन दिवसांपूर्वी फ्रूट मार्केटकडून घनकचरा व्यवस्थापन शुल्क म्हणून दोन लाख रुपये वसूल करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच शहरातील दोन नामांकित दवाखान्यांकडून शुल्क व दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कॉलेज रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलकडूनही कचरा शुल्क वसूल करण्यात आले. महापालिकेचे पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व पर्यावरण निरीक्षक विविध ठिकाणी तपासणी करून कारवाई करत आहेत.

गुरुवारी अयोध्यानगर येथील विजया हॉस्पिटलकडून कचरा शुल्क म्हणून 11 हजार, दंड 25 हजार असा एकूण 36 हजार रुपयांचा चेक घेण्यात आला. त्याचबरोबर शिवाजीनगर येथील कसबेकर मेटगूड हॉस्पिटलकडून तशाच प्रकारचा 36 हजार रुपयांचा चेक घेण्यात आला. कॉलेज रोडवरील आदर्श पॅलेस हॉटेलकडून कचरा शुल्क म्हणून 27 हजार रुपये वसूल करण्यात आले व त्यांचा व्यापार परवाना 2028 पर्यंत वाढवून देण्यात आला. इतकेच नव्हेतर दोन आस्थापनांच्या व्यापार परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून 5236 रुपयांचे चलन देण्यात आले. महापालिकेकडून शहरातील दवाखाने व हॉटेल्सना आता लक्ष्य करण्यात आले असल्याने कचरा शुल्क न भरणे, व्यापार परवाना न घेणे किंवा त्याचे नूतनीकरण करण्यापूर्वीच व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Tags :

.