राज्यात 1 ऑगस्टपासून होणार ‘एआय’ चलनची दंड वसुली
नियम मोडणाऱ्या चालकांना थेट मोबाईलवर मिळणार ई-चलन
त.भा. प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा कडक बडगा उगारला आहे. येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील प्रमुख रस्त्यांवर बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना थेट ई-चलन (ऑनलाईन दंड) पाठवण्यास सुरुवात होईल, अशी अधिकृत घोषणा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल बुधवारी केली.
‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ अंतर्गत सध्या राज्यात या कॅमेऱ्यांची प्रायोगिक चाचणी सुरू आहे. 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात केवळ मोजकेच आणि प्रमुख नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
यामध्ये प्रामुख्याने हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि वेग मर्यादा ओलांडणे यांसारख्या गंभीर नियमांचा समावेश असेल. सुरुवातीच्या काळात चालकांना कमीत कमी दंड आकारून सुधारण्याची संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विमा नूतनीकरणासाठी 1 महिन्याचा ‘ग्रेस पिरीयड’
अनेक वाहनचालकांचा विमा संपलेला असण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने मोठा दिलासा दिला आहे. एआय कॅमेऱ्यांद्वारे विम्याची तपासणी केली जाईल, मात्र ज्यांचा इन्शुरन्स संपला आहे त्यांना त्वरित तो रिन्यू करून घेता यावा, यासाठी 1 महिन्याची सवलत देण्यात आली आहे. या एका महिन्यात विम्याअभावी दंड केला जाणार नाही. परंतु, वाहनचालकांनी ही मुदत संपण्यापूर्वी आपल्या वाहनाचा विमा त्वरित रिन्यू करून घ्यावा, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले आहे.