ओला-सुका कचरा वर्गीकरण करून जमा करा
मनपा आयुक्तांचे निर्देश : अंमलबजावणीला सुरुवात
बेळगाव : सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करूनच तो जमा करावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. यामुळे मागील दोन दिवसांपासून टप्प्याटप्प्याने सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून जमा केला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून जमा न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे असते. तुरमुरी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करताना अधिक मेहनत लागते. ओल्या कचऱ्यांपासून खत निर्मिती केली जाते.
सुक्या कचऱ्याचा वापर नवीन प्लास्टिकच्या वस्तू तसेच साहित्य तयार करण्यासाठी होतो. परंतु कचरा वर्गीकरण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागते. ही बाब लक्षात घेऊन नूतन आयुक्त शुभा बी. यांनी वर्गीकरण करूनच कचरा जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील काही वॉर्डमध्ये अशाप्रकारे सुका व ओला कचरा वर्गीकरण करून घेतला जात आहे. कचरावाहू वाहनांमध्येही दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये कचरा गोळा केला जातो. सुका कचरा, ओला कचरा स्वतंत्रपणे जमा न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनाही अशाच प्रकारे ओला व सुका कचरा स्वतंत्र पद्धतीने द्यावा लागणार आहे.
उपक्रमाची योग्य अंमलबजावणी होईल का?
आयुक्तांच्या निर्णयाचे कौतुक होत असले तरी जमा केलेला कचरा ट्रकमधून घेऊन जाताना तो एकत्रच जमा केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जरी लहान वाहनांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्र पद्धतीने असला तरी मोठ्या वाहनात एकत्रच कचरा भरला जात असल्याने या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी होईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.