भारतातून कॉफी निर्यात 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वर्ष 2024 मध्ये भारतातून कॉफीची निर्यात 10 टक्क्यांनी वाढू शकते. उद्योग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जागतिक किमतीत वाढ झाल्यामुळे युरोपीयन खरेदीदार चांगल्या किमतीत कॉफी खरेदी करत आहेत. भारत चहा उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु जगातील आठव्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश आहे. विशेषत: भारतात, रोबस्टा बीन्सचे उत्पादन केले जाते, ज्याचा वापर झटपट कॉफी बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय महागड्या अरेबिका जातीचे उत्पादनही येथे घेतले जाते. भारतीय कॉफीला, विशेषत: रोबस्टा बीन्सची मागणी जास्त आहे कारण कमी उत्पादनामुळे जागतिक किमती जास्त आहे. कॉफी एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश राजा म्हणाले या वर्षी कॉफीच्या निर्यातीत 10 टक्के वाढीचा अंदाज आहे.
रोबस्टा कॉफी किमान 15 वर्षांच्या उच्चांकावर आहे. कारण जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक व्हिएतनाम 2023-24 मध्ये मागील हंगामाच्या तुलनेत कमी उत्पादन घेण्याची शक्यता आहे. भारत त्याच्या एकूण उत्पादनापैकी तीन चतुर्थांश निर्यात करतो, जी प्रामुख्याने इटली, जर्मनी आणि बेल्जियमला होते. साधारणपणे, भारतीय कॉफीची किंमत जागतिक मानकांपेक्षा जास्त असते. कारण ती सावलीत तयार केली जाते, हाताने खुडली जाते आणि उन्हात वाळवली जाते. निर्यातदारांचे म्हणणे आहे की यावर्षी जागतिक उत्पादन सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतीय कॉफीच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. ग्लोबल ट्रेड हाऊसशी संबंधित बेंगळुरूस्थित डीलरने सांगितले की, 2024 मध्ये कॉफीची निर्यात 2,98,000 टनांपर्यंत वाढू शकते, जी गेल्या वर्षी 2,71,420 टन होती. मागणी मजबूत असल्याने लंडन फ्युचर्समध्ये भारतीय रोबस्टा चेरीच्या किमती 300 डॉलर प्रति टनच्या आसपास आहेत.
पावसामुळे व्यत्यय
सरकारच्या कॉफी बोर्डाचा अंदाज आहे की 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2023-24 हंगामात भारताचे उत्पादन 3,74,000 टनांपर्यंत वाढू शकते, जे गेल्या वर्षी 3,52,000 टन होते. मात्र, पावसामुळे उत्पादनात वाढ मर्यादित राहणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.