एआय कंपन्यांसाठी लवकरच आचारसंहिता
केंद्र सरकारकडून तयारी सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर काम करणाऱ्या कंपन्यांसाठी लवकरच आचारसंहिता जारी करू शकते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या दिशेने काम करत असून नववर्षाच्या प्रारंभी ही आचारसंहिता जारी होणार आहे.
लोकशाहीच्या पद्धतीने अधिकाधिक सामाजिक कल्याणासाठी एआयचा वापर केला जावा, कारण एआयच्या दुरुपयोगाचीही भीती आहे. आगामी काळात शिक्षण, प्रशासकीय व्यवस्थेपासून उद्योगापर्यंत व्यापक स्वरुपात एआयचा वापर होणार असल्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे सांगणे आहे.
भारताच्या एआय मिशनमध्ये कॉम्प्युटिंग क्षमता, डाटासेट अॅक्से, कौशल्य निर्मिती पुढाकार आणि नैतिक शासन संरचना निर्मिती यासारख्या बाबी मुख्यत्वे सामील आहेत. एआय कंपन्यांवर आचार संहिता लागू करण्याचे कुठलेही कायदेशीर बंधन नसेल आणि हे त्यांच्या इच्छेवर निर्भर असणार आहे. सध्या एआयवरून देशात कुठलाही समग्र कायदा नाही आणि याकरता कायदा लागू करण्यास काही कालावधी लागू शकतो.
विचारविनिमय सुरू
कायद्यासंबंधी एआय कंपन्यांसोबत अन्य घटकांशी सातत्याने विचारविनिमय केला जात आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी एआयशी संबंधित प्रशिक्षण, त्याचा वापर, विक्री, एआयची ओळख आणि त्याचा गैरवापर यासारख्या गोष्टींशी संबंधित आचारसंहिता जारी केली जाणार आहे. सरकार एआयवरून जागतिक मॉडेल तयार करविण्यासाठी आग्रही असून यावरून संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडित संस्थांसोबत चर्चा केली जात आहे. भारताने एआयवरून जागतिक नियम तयार करण्यासाठी जगाचे नेतृत्व करण्याकरता स्वत:ची तत्परता जाहीर केली आहे.