नारळ आणणार डोळ्यांत पाणी
स्वयंपाकाचे गणित बिघडले : शेजारील राज्यातही नारळाचा तुटवडा
मडगाव : गोव्यात गेल्या वर्षभरापासून नारळाचा तुटवडा भासत आहे. साहजिकच राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातही नारळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मध्यम आकाराचा नारळ 40 रुपयांनी विकला जात आहे. नारळाचे दर आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाक घरातील गणित आणखी बिघडणार आहे. गोव्यासहीत शेजारील महाराष्ट्र तसेच कर्नाटक ते केरळपर्यंत नारळाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. नारळ प्रतिकिलो 75 रुपयांवर पोचलेला आहे. तो आगामी काळात 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गोव्यात खेती, माकडांमुळे नारळाचे पीक मोठ्या प्रमाणात घटू लागले आहे. त्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. त्याचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. वन खाते किंवा कृषी खाते त्यावर उपाय योजना करू शकलेले नाही.
परराज्यातून येणाऱ्या नारळांची आवक घटली
शेजारील कर्नाटक राज्यातून गोव्यात नारळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. मात्र, ही आवक घटल्याची माहिती मडगावातील व्यापारी विघ्नेश प्रभुदेसाई यांनी दिली. विघ्नेश प्रभुदेसाई हे किसलेले खोबरे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पुरविण्याचा व्यवसाय करतात. आपल्याला दररोज किमान दहा ते 15 हजार नारळ लागतात. तसेच आपण मोठ्या प्रमाणात नारळांचा साठा करून ठेवतो. कारण, ऐनवेळी नारळ शोधण्यासाठी धावपळ करावी लागू नये. मात्र, शेजारील राज्यातून होणारी आवक घटल्याने व्यवसाय पुढे कसा चालवायचा हा आपल्यासमोर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याच हॉटेलमधून आता नारळाच्या खोबऱ्यापासून बनविली जाणारी ‘चटणी’ गायब झाली असून टोमॅटो व शेंगदाणे वापरून चटणी तयार करण्यावर हॉटेल मालकांनी भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
केरळने नारळाची निर्यात थांबवली
केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात नारळाची आखाती देशांमध्ये निर्यात केली जात होती. मात्र, पीक घटल्याने केरळने नारळाची निर्यात बंद केली आहे. काही राज्यांमध्ये केवळ खोबरेल तेलासाठीच नारळ वापरले जातात. सर्वत्र नारळांचे पीक घटल्याने समस्या निर्माण झालेली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच नारळांचा पाडा केला जातो. त्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनी नारळ बाजारपेठेत दाखल होत असतो. तेव्हा नारळांचे दर घटतात. मात्र, नारळांच्या दरात घट होण्याऐवजी ते वाढत असल्याने गृहिणींसहीत हॉटेल व रेस्टॉरंटचे गणित बिघडणार आहे. गोवेकरांचा स्वयंपाक हा नारळाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे नारळांचे वाढलेले दर खिश्यावर ताण निर्माण करीत आहे. अगोदरच महागाई गगनाला भिडली आहे. त्यात आता नारळसुद्धा महाग झाल्याने सर्वांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.
शहाळ्यामुळेही नारळांचे प्रमाण घटले
गर्मीचे दिवस असल्याने शहाळ्यांची मागणी वाढली आहे. शहाळी 50 रुपयांच्या पुढे गेली आहे. परिपूर्ण नारळ होण्यापूर्वीच शहाळी काढली जात असल्याने नारळांचे प्रमाण घटल्याचे सांगितले जात आहे.