किरकोळ बाजारात नारळाच्या दरात वाढ
30 ते 50 रुपये एक : वाटी खोबरेही 240 रु. किलो
बेळगाव : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून नारळाच्या किमतीही वाढल्या आहेत. एका नारळासाठी 30 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणी, हॉटेल, मेस आणि इतर व्यावसायिकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. विशेषत: वाटी खोबरेही प्रति किलो 240 रुपयांच्या पुढे गेले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून नारळाच्या दरात वाढ झाली आहे. एरवी 15 ते 20 रुपये मिळणारा नारळ आता 30 ते 50 रुपये झाला आहे. सध्या यात्रा-जत्रा आणि लग्नसराईमुळे बाजारात खरेदीची वर्दळ वाढू लागली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने नागरिकांना जादा दराचे चटके सहन करावे लागत आहेत.
यात्रा-जत्रांमुळे नारळाला आणि वाटी खोबऱ्याला मागणी वाढली आहे. मात्र दर अधिक असल्याने खिशाला कात्री लागत आहे. बाजारात कडधान्य, डाळी, खाद्यतेल आणि किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. कडधान्य आणि डाळींनी शंभरी गाठली आहे. त्यातच आता नारळाचे दरही चढेच असल्याने जादा पैसे मोजावे लागत आहेत. शिवाय वाढत्या उन्हामुळे शहाळ्याला मागणी वाढू लागली आहे. मात्र शहाळ्यांच्या किमतीही 40 ते 100 रुपयांपर्यंत गेल्या आहेत. सुक्या खोबऱ्याला मागणी वाढत आहे. प्रति किलो 180 रुपयाला मिळणारे खोबरेही 240 रुपये झाले आहे. त्यामुळे तिखट चटणी आणि यात्रा-जत्रांसाठी खोबरे खरेदी करणाऱ्यांना जादा दराचा चटका बसू लागला आहे.