नारळाचे दर भडकले,प्रतिनग 30 रुपयांहून जास्त
पणजी : मावळते वर्ष 2024 सरताना गेल्या दोन आठवड्यांपासून नारळाचे दर भडकले असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. गोव्यातील लोक दररोजच्या भोजनात नारळाचा वापर करतात तसेच देवकार्यातही नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. नारळाचे दर किमान रु. 30 आणि त्याच्या पुढे गेले असून रु. 15 ते 20 पर्यंत नारळ मिळण्याचे दिवस आता संपुष्टात आल्याचे समोर येत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी विरोधाभासाची अवस्था सध्या दिसत असल्याने त्याचा परिणाम होऊन नारळाचे दर वधारल्याचे सांगण्यात आले. वर्षभर सुरु असणाऱ्या हिंदुंच्या सणासुदीच्या काळात नारळाची गरज असते आणि ती वाढते. त्यानुसार सध्या नारळ उपलब्ध होत नसल्याने दर वाढल्याची माहिती देण्यात आली. गोव्यात नारळाचे उत्पादन कमी होताना दिसत असून नारळाची झाडे रोगामुळे नष्ट होत असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय नारळ पाडणारे पाडेली मिळत नसल्याने ते झाडावरून पडून मालकाऐवजी इतरांना मिळतात. त्यामुळे नारळाची मिळकत कमी होत असून इतर राज्यातून नारळ मागवल्याशिवाय मागणी पूर्ण होत नसल्यामुळे दर भडकल्याचे नारळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
शहाळेही महागले
शहाळीदेखील महागली असून त्यांचे दर प्रतिनग रु. 60 व त्याच्या पुढे गेले आहेत. शहाळ्याचे पाणी आरोग्यदायी असल्याने शहाळ्यांनाही मोठी मागणी असते. त्याशिवाय दररोजच्या भोजनाचा नारळ हा एक अविभाज्य घटक आहे. त्याशिवाय गोमंतकीय जनतेच्या घरांमध्ये भोजनच तयार होत नाही. विक्रेत्यांनाही दैनंदिन ग्राहक असतात. स्वयंपाक घरात आणि देवकार्यातही नारळाचे स्थान अढळ आहे. सध्या तरी नारळाच्या दरवाढीने सामान्य लोक त्रस्त झाले असून अनुदान स्वरुपात स्वस्त दराने नारळ देण्याची मागणी होत आहे.