For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘झुरळे’ बनणार आपत्तीसाहाय्यक

06:10 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘झुरळे’ बनणार आपत्तीसाहाय्यक
Advertisement

महापूर, भूस्खलन, वादळे किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती किती विनाशकारी असतात याची आपल्याला माहिती आहे. विशेषत: भूकंप, भूस्खलन आणि महापूर यांच्यात माणसे ढिगाऱ्यांखाली अडकण्याचा दाट संभव असतो. ढिगारा उपसला जाईपर्यंत ही माणसे आतच अडकून पडतात आणि त्यांना साहाय्यता पोहचविणेही अशक्य होत असते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ऑस्टेलियाच्या संशोधकांनी यांत्रिक झुरळांची निर्मिती केली आहे. ही झुरळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांपर्यंत पोहचतात आणि त्यांना औषधे, जीवनसत्वांच्या गोळ्या अशासारख्या जीव वाचविणाऱ्या वस्तू पोहचवू शकतात. ही  झुरळे खऱ्या झुरळांप्रमाणेच दिसतात आणि खऱ्या झुरळांप्रमाणेच अत्यंत अरुंद फटीत किंवा भोकांमध्ये शिरु शकतात. अशा प्रकारे ती कितीही अरुंद जागेत अडकलेल्या माणसांपर्यंत पोहचू शकतात आणि त्यांना आवश्यक त्या सूक्ष्म वस्तूंचा पुरवठा करुन ढिगारा उपसला जाईपर्यंत जिवंत ठेवू शकतात. तसेच या झुरळांचा अन्य एक उपयोगही महत्वाचा आहे. माणूस ढिगाऱ्यात नेमका कोणत्या स्थानी अडकला आहे, हे त्यांच्यामुळे बाहेरच्या माणसांना समजू शकते. त्यामुळे या स्थानाच्या आसपासचा ढिगारा उपसताना आत अडकलेल्या माणसांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे ते काम करण्sा शक्य होणार आहे. संशोधकांनी या झुरळांना ‘पॅराबॉर्ग्ज’ असे नाव दिले आहे. या झुरळांच्या पाठीवर सूक्ष्म कॅमेरे बसविलेले आहेत. तसेच सेन्सर्सही आहेत. त्यामुळे आसपासची माहिती मिळणे शक्य होईल.

Advertisement

या झुरळांना कृत्रिम चेतायंत्रणा (नर्व्हस सिस्टिम) देण्यात आली असून त्यांच्या शरीरात इलेक्ट्रोड बसविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना दूरसंचालन पद्धतीने नियंत्रित करता येते. त्यांचा मार्ग बदलता येतो. तसेच त्यांच्या हालचालींच्या वेगावरही नियंत्रण ठेवता येते. ही झुरळे निर्माण करताना नैसर्गिक झुरळांच्या ‘जियांट बुरोईंग’ नामक प्रजातीचा उपयोग करण्यात आला आहे, या प्रजातीतील झुरळे जगातील सर्वात मोठ्या आकाराची मानली जातात. या प्रयोगाला 95 टक्के यश मिळाले असून, अशा झुरळांची झुंडी निर्माण करण्याची संशोधकांची योजना आहे, जेणेकरुन ती आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्यासाठी उपयुक्त ठरतील.

Advertisement
Advertisement
Tags :

.