झुरळाचेही निघते ‘दूध’
दूध म्हटले, की आपल्याला गाय, म्हैस, फारतर गाढव किंवा शेळी असे प्राणी आठवणे स्वाभाविक आहे. गाय आणि म्हैस यांचे दूध हा तर आपल्या दैनंदिन आहाराचा भागच आहे. गाढविणीचेही दूध विशिष्ट परिस्थितीत प्यायले जाते. तर अनेक जण शेळीचेही दूध उपयोगात आणतात. पण बहुतेक जणांना आवडत नाही, अशा झुरळ नामक कीटकाचेही दूध निघू शकते, हे समजल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणार हे निश्चित आहे. झुरळही दूध देते. इतकेच नव्हे, तर झुरळाच्या दुधात गाईच्या दुधाच्या तिप्पट अधिक प्रमाणात प्रथिने असतात, हे संशोधनात आढळून आले आहे. या अद्भूत संशोधनाला 2026 चा ‘आयजी नोबेल पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. हे संशोधन अत्यंत मोलाचे मानले गेले आहे.
तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की सर्व प्रकारची झुरळे दूध देत नाहीत. जगात झुरळांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांच्यापैकी फक्त एक प्रजाती दूध देऊ शकते. तिचे नाव ‘पॅसिफिक बीटर कॉक्रोच’ असे आहे. या प्रजातीतील झुरळाची मादी आपल्या पोटातील भ्रूणाची (एम्ब्रियो) योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी या स्फटिकरुपी पौष्टिक दुधाची निर्मिती करते, असे संशोधनात आढळले आहे. हे दूध प्रथम नेहमीच्या दुधासारखे द्रवरुप असते. ते भ्रूणाच्या पोटात गेले की, त्याचे स्फटिकात रुपांतर होते. हे स्फटिक या भ्रूणासाठी उत्तम प्रकारच्या अन्नाचा स्रोत म्हणून काम करतात. या दुधामुळे भ्रूणाची निकोप वाढ होते, असे दिसून येते.
या दुधाच्या एका स्फटिकात प्रथिनांचे प्रमाण तेव्हढ्याच वजनाच्या गाईच्या दुधाच्या तिप्पट असते. झुरळाच्या या दुधाच्या स्फटिकात 45 टक्के प्रथिने, 25 टक्के कार्बोहायड्रेटस् आणि 16 टक्के ते 22 टक्के लिपिडस् असतात. या लिपिडस्मध्ये शरीराला आवश्यक अशी सर्व 9 प्रकारांची अमिनो आम्ले असतात. भ्रूणाच्या पोटातील या दुधाच्या स्फटिकांचे, जेव्हा आवश्यकता असेल, सावकाशपणे तेव्हा द्रवरुप दुधात रुपांतर होते. या दुधावर या झुरळाच्या भ्रूणाचे पोषण होते. या एकाच प्रजातीच्या झुरळांमध्ये दूध का आणि कसे उत्पन्न होते, यावरही संशोधन केले जात आहे. भविष्यकाळात अशा प्रकारचे भरपूर प्रथिने असणारे दूध कृत्रिमरित्या निर्माण केले जाऊ शकेल काय, यावरही शास्त्रज्ञांचा विचार होत आहे.