विदेशी विद्यार्थ्यांकडून 20 लाखांचा कोकेन जप्त
म्हापसा पोलिसांची कारवाई; पुण्याहून गोव्यात दाखल होताच पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील नवीन बस स्थानकावर म्हापसा पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून घातलेल्या छाप्यात युगांडा येथील दोघा नागरिकांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून 20 लाख 50 हजारांचा कोकेन जप्त केला. पोलीस निरीक्षक पालेकर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला. हा अमलीपदार्थ नेमका कोठून व कोणासाठी गोवा राज्यात आणला होता याची चौकशी सुरू असून रिमांड घेतल्यावर ही माहिती मिळविणे शक्य होईल, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी म्हापसा पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे सिंतामू एल्वीस (29), उमर लुकवागो (27) दोघेही मूळ युगांडा, सध्या रा. पुणे येथील असून त्यांच्याकडून 205 ग्रॅम कोकेन म्हापसा पोलिसांनी जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 20 लाख 50 हजार ऊपये होते, अशी माहिती अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दोघेही संशयित टिळक विद्यालयाचे विद्यार्थी
हे दोन्ही संशयित आरोपी विद्यार्थी असून टिळक महाराष्ट्र विद्यालयात ते बीबीएचे शिक्षण घेत आहेत. हे दोघेही भारतात विद्यार्थी व्हिसावर आल्याचे आढळून आले आहे. मुंबई पुणे गोवा या मार्गाने ते गोव्यात आल्याचे अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.
पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
म्हापसा पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, उपनिरीक्षक बाबलो परब, आदित्य गाड, मंगेश फडणीस, हवालदार सुशांत चोपडेकर, तुकाराम नाईक, शिपाई राजेश कांदोळकर, शिपाई प्रकाश पोवळेकर, साईदास पणजीकर, आनंद राठोड यांनी ही कारवाई केली. यापुढेही असे काही आढळल्यास गोवा पोलीस कारवाईस सज्ज असणार आहे, अशी माहिती अधीक्षकांनी दिली.