मुंबईत 15 कोटींचे कोकेन जप्त
गोव्यासह दिल्ली, हैदराबाद, बंगळुरुत जाणार होते : झांबियाच्या पुरुषाला, टांझानियाच्या महिलेस अटक,नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाची कारवाई
पणजी : गोव्यासह इतर मोठ्या शहरांमध्ये पुरविण्यासाठी कोकेन आणण्यात येत असता आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने सोमवारी मुंबईत पर्दाफाश केला. तेथे हॉटेलात राहिलेल्या झांबियाच्या नागरिकाची तपासणी कऊन त्याच्याकडून 15 कोटी ऊपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. एका टांझानियन महिलेलाही याप्रकरणी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले कोकेन गोवा, बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये विक्रीसाठी नेले जात होते. ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. एनसीबी मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवा, मुंबई, दिल्ली आणि बेंगळूर येथे तस्करी करण्यासाठी आफ्रिकन देशातून कोकेन येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीचे पश्चिम क्षेत्रीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चौकशी केली असता, 9 रोजी इथिओपिया येथून एक प्रवासी मुंबईत आल्याची माहिती मिळाली होती.
झांबियन नागरिक घेऊन आला कोकेन
त्या प्रवाशाचा विभागाने शोध घेतला असता, तो मुंबईतील हॉटेलात वास्तव्य करत असल्याचे समजले. त्यानुसार, विभागाने त्याची चौकशी केली असता, ‘ला गिलमोर’ हा झांबियन नागरिक असून त्याला अदिस अबाबा - इथिओपिया येथून कोकेन घेऊन भारतात प्रवास करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली.
बॅगेत सापडले 15 कोटींचे घबाड
त्याची बॅग आणि इतर साहित्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्या बॅगेत लपवून ठेवलेले 15 कोटी ऊपये किंमतीचे 2 किलो कोकेन सापडले. त्याची कसून चौकशी केली असता, हे कोकेन दिल्लीत एका महिलेला देण्याची सूचना आंतरराष्ट्रीय तस्करांनी त्याला केली होती, असे तपासात उघड झाले. एनसीबीने त्याच्यामार्फत दिल्लीतील महिलेशी संपर्क साधून त्याला दिल्लीत नेले. ठरल्याप्रमाणे महिला ड्रग्ज घेण्यासाठी आली असता, विभागाने तिला ताब्यात घेतले. या महिलेचे नाव एमआर आगुस्तिनो असून ती टांझानियाची नागरिक आहे. त्यानंतर एनसीबीने या दोघांनाही मुंबईत आणले आणि रितसर अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही विदेशी नागरिकांना मुंबईतील न्यायालयाने एनसीबीची कोठडी ठोठावली आहे.