चिकोळण्यात कोकेनचे घबाड जप्त
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई : तब्बल 43. 20 कोटींचे कोकेन, तिघांना अटक
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडीने) आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या अंमलीपदार्थ तस्करीच्या विरोधातील कारवाईत तब्बल 43 कोटी 20 लाख ऊपये किमंतीचा 4 किलो 320 ग्रॅम ड्रग्ज (उच्च दर्जाचे कोकेन) जप्त केला आहे. या प्रकणात तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. चिकोळणा बसस्थानकावर केलेली ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. पणजीतील पोलिस मुख्यालायत काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी वरील माहिती दिली. त्यांच्या सोबत उपअधीक्षक राजेश कुमार, निरीक्षक प्रशल देसाई, लक्षी आमोणकर, तुषार लोटलीकर उपस्थित होते. अटक केलेल्या संशयितामध्ये निबू विन्सेंट उर्फ विल्सन (45), तो मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असून बायणा वास्को येथे राहत होता. तसेच रेश्मा मंगेश वाडेकर व मंगेश जयवंत वाडेकर (दोघेही पतीपत्नी असून ती हार्बर रोड, सडा, मुरगाव येथे राहतात) यांचा समावेश आहे.
चिकोळणा बसस्थानकावर अटक
संशयित विल्सन हा ड्रग्ज देण्यासाठी चिकोळणा बसस्थानकावर येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून चॉकलेट आणि कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले 4.325 किलोग्रॅम पांढऱ्या रंगाचा पावडरसारखा पदार्थ जप्त केला असून तो कोकेन असल्याचे उघड झाले आहे. विल्सन याची सखोल उलटतपासणी केली असता त्याने मंगेश आणि रेश्मा यांची नावे उघड केली तेव्हा त्यांनाही अटक करण्यात आली. रेश्मा हिने हा कोकेन मागविला होता. तो गोव्यात वितरीत करण्याचा प्रयत्न ती करीत होती. तिने ग्राहक ठरविला होता. बसस्थानकावर येणाऱ्या व्यक्तीला पार्सल दे असे तिने विल्सनला सांगितले होते. विल्सन आणि मंगेश ड्रग्ज वितरणात सहभागी होते, त्यांना मालासह पकडण्यात यश आले.
कोकेनची तब्बल 32 पाकिटे
एकूण 32 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत, ज्यामध्ये कोकेन होते. पाकिटांचे पॅकेजिंग अत्याधुनिक आणि काळजीपूर्वक तयार केलेले असल्याचे दिसत होते. या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अधीक्षक गुप्ता म्हणाले. रेश्मा अलीकडेच परदेशात गेली होती. त्यामुळे जप्त केलेला ड्रग्ज भारताबाहेरून आणला होता काय? याबाबत तपास सुऊ आहे. संशयित वाडेकर जोडप्याची पार्श्वभूमी तपासली असता वाडेकर जोडपे सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले आहे. रेश्माला यापूर्वी वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मंगेशवर बलात्काराचा आरोप आहे. नेबू विन्सेंटचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नाही. कदाचित त्याचा कुरिअर बॉय म्हणून वापर होत असेल, असा संशय आहे.
सीआयडीने काही आठवड्यांपूर्वीच, 11 कोटी 67 कोटी ऊपयांच्या हायड्रोपोनिक ड्रग्जचा पर्दाफाश केला होता, जी राज्यातील सर्वात मोठी अमलीपदार्थ जप्ती होती. चिकोळणाच्या या कारवाईने आता तो विक्रम मोडला आहे. पोलिस आता वाडेकर निवासस्थानी घराची झडती घेण्याची योजना आखत आहेत आणि व्यापक अमली पदार्थ पुरवठा नेटवर्कचा तपास सुरू ठेवत आहेत. वाडेकरांचे दोन्ही मुलगे यात सहभागी असल्याचे कोणतेही संकेत नसले तरी. त्यांच्या संबंधांची शक्यता नाकारता येत नाही. सीआयडीने 2025 साला आतपर्यंत तब्बल 55 कोटी 27 लाख 64 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. त्यात एनडीपीएस कायद्याखाली एकूण 8 तक्रारी नोंद केल्या असून 12 संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई सीआयडीचे निरीक्षक लक्षी आमोणकर, प्रशल देसाई, महिला उपनिरीक्षक प्रगती मळीक, कॉन्स्टेबल नवीन पी. पालयेंकर, समिउल्ला मकांदर, सुजय नाईक, संकल्प नाईक, राहुल पी. नाईक, रोशनी शिरोडकर आणि हवालदार नितम खोत यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुऊ आहे.
गोव्यात येणाऱ्या ‘ड्रग्स’ प्रकरणी केंद्राकडे पत्रव्यवहार करणार : मुख्यमंत्री
गोव्यात हल्ली मोठ्या प्रमाणात ‘ड्रग्स’ येत असल्याने ती चिंतेची बाब बनली आहे. ‘ड्रग्स’ प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी आता आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली. चिकोळणा-मुरगांव येथे काल मंगळवारी 43.20 कोटीचे कोकेन जप्त केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा पोलिसांचे तोंड भरून कौतूक केले. मात्र, मोठ्या प्रमाणात ड्रग्स गोव्यात येऊ लागल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. चिकोळणा-मुरगांव येथे जप्त करण्यात आलेला कोकेन हा थायलंडमधून आल्याची माहिती आहे.
त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोकेन जप्त केल्यानंतरही विरोधकांनी टीका केली. जर गोवा पोलिसांनी कारवाई करून कोकेन जप्त केला नसता तर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली नसती. निदान पोलिस कारवाई करून ड्रग्स जप्त करतात, तेव्हा विरोधकांनी पोलिसांचे अभिनंदन तरी करायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विदेशातून ड्रग्स आणताना ते विमान असो किंवा जहाजातून आणावे लागतात. अशावेळी विमानतळ सुरक्षा योजना असो किंवा जहाजातून आणताना पोर्टावरील सुरक्षा असो ती भेदून ड्रग्स आणले जातात. त्या संदर्भात कठोर कारवाई व्हावी यासाठी आपले प्रयत्न असतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली.