Panchgani Breaking | पर्यटननगरीत कोकेन ड्रग्सचा काळा कारभार उघड
हिल स्टेशनवर कोकेन तस्करीचा धक्कादायक पर्दाफाश
पाचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये ड्रग्सच्या काळ्या कारभाराचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. पाचगणी पोलिसांनी आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत मुंबईवरून आलेल्या स्कोडा आणि एमजी हेक्टर या आलिशान वाहनांमधून आलेल्या १० संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत कोकण कॅप्सूलसह अंदाजे १३ ग्रॅम, लाखो रुपयांचा ड्रग्स मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमजी हेक्टर आणि स्कोडा गाडीतून सदर व्यक्ती हे पर्यटक घेऊन आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे मात्र दहा जणांना सध्या ताब्यात घेण्यात आली आहे
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जावळी तालुक्यातील सावळी येथे ११५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्या मोठ्या कारवाईनंतर लगेचच आता पर्यटननगरी पाचगणीमध्ये ड्रग्सचा सप्लाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पाचगणी पोलीस ठाणे आणि सातारा एलसीबीने तत्काळ हालचाली वाढवत सापळा रचला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून पाचगणी परिसरात ड्रग्सचा कोकण सप्लाय केला जात असल्याची ठोस माहिती पोलिसांकडे होती. त्यानुसार संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्यात आले. योग्य वेळी कारवाई करत स्कोडा आणि एमजी हेक्टर या दोन वाहनांना अडवून तपासणी केली असता ड्रग्सचा साठा आढळून आला. यानंतर वाहनांमधील १० जणांना ताब्यात घेत कोकेन ड्रग्ससह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणीसारख्या शांत हिल स्टेशनमध्ये कोकेन ड्रग्सचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पर्यटन स्थळांचा गैरवापर करून कोकेन ड्रग्सचे जाळे पसरवले जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या मागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
पाचगणी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कोकेन ड्रग्स तस्करांचे मनोबल खच्ची झाले असून, जिल्ह्यात ड्रग्सविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. यामध्ये आणखीन कोणी स्थानिकांचा समावेश आहे का हे देखील आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे