इंडोनेशियात विकले जाते कोब्रा मीट
प्रत्येक देशाची स्वत:ची संस्कृती असते, परंतु यातील विविधता पाहून लोक दंग होत असतात. अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात इंडोनेशियाच्या स्ट्रीट फूड स्टॉलवर सापाचे मांस विकले जात असल्याचे दिसून येते.
या व्हिडिओला आतापर्यंत 42 दशलक्षापेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. एका भारतीय व्लॉगरने जकार्ताच्या रस्त्यांवर फिरताना सापाचे रक्त आणि मांसाला स्नॅक म्हणून खायला देताना पाहिले आहे. इंडोनेशियाचे लोक सापाचे मांस, खासकरून कोब्रा अत्यंत आवडीने खात असल्याचे या व्लॉगरने सांगितले आहे.
कोब्राचे मांस इंडोनेशियात सुमारे 1 हजार रुपयांमध्ये मिळते. हे मांस त्वचा आणि रोगप्रतिकारकक्षमतेसाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते अशी माहिती व्लॉगरने दिली आहे. व्हिडिओत एक विक्रेता कोब्राला पिंजऱ्यातून बाहेर काढताना, ग्रिल करताना आणि ग्राहकांना ते खायला देताना दिसून येतो.
या व्हिडिओने आता सोशल मीडियावर नव्या चर्चेला जन्म दिला आहे. एका युजरने एक दिवस तेथे जाईन आणि त्यांना डाळभात खाणे शिकवेन अशी कॉमेंट केली आहे. तर अन्य एका युजरने पृथ्वीवर सर्वात धोकादायक जीव माणूसच असल्याचे सिद्ध झाल्याचे म्हले आहे. चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये सापांचे मांस खाणे सामान्य बाब आहे. विशेषकरून चीनच्या अनेक गावांमध्ये यासाठी स्नेक फार्मिंग केले जाते. परंतु साप खाणे सर्वत्र सामान्य बाब नाही, याचमुळे अनेक लोकांना हे विचित्र वाटू शकते.