कोबोली, पाओलिनी, फेरी, नोस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत
अॅलेक्स डी मिनॉर, अलेक्झांड्रा इला, डिमिट्रोव्ह, मॅडिसन किज, बुब्लीक यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था, लंडन
2026 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत फ्लेव्हिओ कोबोली, अमेरिकेचा टेलर फ्रित्झ तसेच ब्रिटनचा फेरी यांनी पुरूष विभागात तर महिलांच्या विभागत जस्मिन पाओलिनी, मार्टा कोस्ट्यूक, झेकची लिंडा नोस्कोव्हा यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर, बल्गेरीयाचा डिमिट्रोव्ह, फिलिपिन्सची अॅलेक्झांड्रा इला, कझाकस्तानच्या अलेक्झांड बुब्लीक आणि अमेरिकेच्या मॅडिसन किजचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरूषांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या फ्लेव्हिओ कोबोलीने ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या मानांकीत अॅलेक्स डी मिनॉरचा 7-5, 7-6 (7-4), 6-3 अशा सेटमध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रित्झने कझाकस्तानच्या बुब्लीकचे आव्हान 7-6 (7-1), 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत गेल्या चार वेळेला उपांत्यपूर्व फेरी गाठणारा फ्रित्झ हा अमेरिकेचा दहावा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या पीट सांप्रास, जिमी कॉनर्स आणि जॉन मॅकेन्रो यांनी हा पराक्रम केला होता. टेलर फ्रित्झने 2024 मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्याला इटलीच्या सिनरकडून पराभव पत्करावा लागला होता. ब्रिटनच्या फेरीने बल्गेरीयाच्या डिमीट्रोव्हचे आव्हान 7-5, 3-6, 4-6, 6-4, 7-6 (10-7) अशा पाच सेट्समधील लढतीत संपुष्टात आणले. या स्पर्धेत एकेरीमध्ये ब्रिटनचे आव्हान जीवंत ठेवणारा फेरी हा एकमेव टेनिसपटू ठरला आहे.
महिलांच्या विभागात जस्मिन पाओलिनीने चौथ्या फेरीतील सामन्यात फिलीपीनोच्या अॅलेक्झांड्रा इलाचा 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. आता पाओलिनीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मार्टा कोस्ट्यूकशी होणार आहे. युक्रेनची मार्टा कोस्ट्यूकने या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारताना अॅस्लिन व्रुजेरचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला.
झेकच्या लिंडा नोस्कोव्हाने अमेरिकेच्या मॅडीसन किजचा 6-4, 7-6 (7-2) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाने या स्पर्धेची यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. नोस्कोव्हाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इलेसी मर्टन्सबरोबर होणार आहे.