तटरक्षक दलाचे ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळले
पोरबंदर विमानतळावर अपघात; दोन वैमानिकांसह तिघांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर रविवारी मोठा अपघात झाला. भारतीय तटरक्षक दलाचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सदर हेलिकॉप्टरच्या नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. तटरक्षक दल अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटसह तीन जण होते. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, तटरक्षक दलाकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेलिकॉप्टरच्या टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पोरबंदर विमानतळावर उतरताना ते कोसळले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दुपारी 12.10 वाजता घडल्याचे पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथ सिंह जडेजा यांनी सांगितले. हेलिकॉप्टर धावपट्टीवर कोसळल्यानंतर स्फोट झाल्याने आग लागली. बचावकार्यावेळी सर्व तीन क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यात आले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिघांनाही पोरबंदर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, तिन्ही क्रू मेंबर्सचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कमलाबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश कन्मिया यांनी सांगितले.
या दुर्घटनेबाबत तटरक्षक दलाकडून सखोल तपास केला जात आहे. सद्यस्थितीत प्राथमिक टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, नेमके कारण शोधण्यासाठी विशेष तज्ञांकडून तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.