कोळसा उत्पादन 11 टक्क्यांनी वधारले
वाढीसह उत्पादन 9.28 कोटी टनाच्या घरात
नवी दिल्ली :
भारताचे कोळसा उत्पादन डिसेंबर 2023 मध्ये 10.75 टक्क्यांनी वाढून 92.8 दशलक्ष टन झाले आहे. मंगळवारी अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. डिसेंबर 2022 मध्ये देशातील कोळसा उत्पादन 8.38 कोटी टन होते.
कोळसा क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे, कोळसा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. उत्पादन, पुरवठा आणि स्टॉक पातळीने नवीन उंची गाठली आहे.
देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडिया लिमिटेडचे उत्पादन गेल्या महिन्यात 8.27 टक्क्यांनी वाढून 7.18 कोटी टन झाले, तर डिसेंबर 2022 मध्ये ते 6.63 कोटी टन होते. निवेदनानुसार, एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत भारताचे एकूण कोळसा उत्पादन वाढून 684.3 दशलक्ष टन झाले आहे जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 608.3 दशलक्ष टन होते. डिसेंबरमध्ये कोळशाचा पुरवठा 8.36 टक्क्यांनी वाढून 86.2 दशलक्ष टन झाला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 79.5 दशलक्ष टन होता.
यासह, मंत्रालयाने सांगितले की, कोळसा उत्पादन आणि पुरवठा सातत्य राखण्यासाठी, विश्वासार्ह आणि गतिमान ऊर्जा क्षेत्रासाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ते वचनबद्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे.