हिस्सेदारी विक्रीमुळे कोल इंडियाचे समभाग प्रभावीत
कोल इंडियाचे समभाग 5 टक्क्यांनी घसरणीत : हिस्सेदारी विक्रीचा परिणाम
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकार ओएफएसद्वारे कोल इंडियामधील 2 टक्क्यांची हिस्सेदारी विकत आहे. या विक्रीमध्ये 1 टक्के शेअर्सची मूळ ऑफर आणि ओव्हरसबक्रिप्शन झाल्यास अतिरिक्त 1 टक्के हिस्सेदारीच्या विक्रीचा समावेश आहे. या घोषणेनंतर, 27 मे रोजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून 428 रुपयांवर आले.
दरम्यान, नंतर त्यात थोडी सुधारणा झाली असून तो पुन्हा 446 रुपयांवर पोहोचला आहे. सरकारने या विक्रीसाठी प्रति शेअर 412 रुपयांची किमान किंमत (फ्लोअर प्राईस) निश्चित केली आहे, जी मागील बंद भावापेक्षा सुमारे 11.2 टक्के कमी आहे.
सरकारचे ध्येय हे 5 हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचे आहे. ओएफएस विंडो 27 मे आणि 29 मे रोजी खुली राहणार असल्याची माहिती आहे. 27 मे रोजी केवळ बिगर-किरकोळ गुंतवणूकदारच बोली लावू शकतील. 29 मे रोजी किरकोळ आणि बिगर-किरकोळ दोन्ही गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतील. सरकारने सुरुवातीला 6.16 कोटी शेअर्स देऊ केले आहेत. ओव्हरसबक्रिप्शन झाल्यावर अतिरिक्त 6.16 कोटी शेअर्स विकले जातील.
चौथ्या तिमाहीत नफ्यात 11 टक्के वाढ
कोल इंडियाची मार्च तिमाहीतील कामगिरी स्थिर राहिली. कंपनीचा करानंतरचा एकत्रित नफा वार्षिक 11 टक्क्यांनी वाढून 10,908 कोटी झाला. कामकाजातून मिळणारा महसूलही सुमारे 6 टक्क्यांनी वाढून 46,490 कोटी झाला. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2026 साठी प्रति शेअर 5.25 लाभांश जाहीर केला आहे, जो आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून दिला जाईल.
ऑफर फॉर सेल : सूचीबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तकांसाठी एक्सचेंजद्वारे पारदर्शकपणे आपली हिस्सेदारी विकण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यात प्रामुख्याने मोठे संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदार सहभागी होतात आणि ही प्रक्रिया सामान्य आयपीओपेक्षा अधिक वेगाने पूर्ण होते.