प्रशिक्षक श्रीजेशची पहिली कसोटी सुलतान ऑफ जोहोर चषकात
आज भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचा सामना जपानशी
वृत्तसंस्था/ जोहोर (मलेशिया)
भारतीय कनिष्ठ पुऊष हॉकी संघ आज शनिवारी येथे 12 व्या सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जपानशी सामना करणार असून यावेळी आपले प्रशिक्षक पी. आर. श्रीजेशकडून प्रेरणा घेण्याचे ध्येय ते निश्चितच बाळगतील. दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या श्रीजेशसाठी ही पहिली ‘कोचिंग असाइनमेंट’ आहे. तो ऑगस्टमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रभावी कामगिरीनंतर निवृत्त झाला होता.
मे, 2023 मध्ये झालेल्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारताची जपानशी शेवटची गाठ पडली होती आणि त्यात भारतीय संघाने 3-1 असा विजय मिळवला होता. तर 2022 च्या सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धेत भारताने 5-1 ने त्यांचा पराभव केला होता. नवीन मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेशच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगला सराव केला आहे आणि आम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली आमची पहिली स्पर्धा खेळण्यास उत्सुक आहोत, असे कर्णधार अमीर अलीने म्हटले आहे.
गेल्या वेळी जर्मनीकडून पराभूत झाल्याने आम्ही आमचा किताब राखू शकलो नाही. परंतु यावेळी आम्ही अधिक सुसज्ज आहोत आणि स्पर्धेतील कोणत्याही संघाचा सामना करण्यास तयार आहोत, असेही त्याने सांगितले. भारताचा सामना 20 रोजी ब्रिटनशी होईल आणि एक दिवसाच्या विश्रांतीनंतर संघ 22 रोजी यजमान मलेशिया आणि त्यानंतर 23 रोजी ऑस्ट्रेलियाविऊद्ध खेळेल.
भारत 25 रोजी न्यूझीलंडविऊद्धच्या सामन्याने गट स्तराचा समारोप करेल. 26 रोजीच्या अंतिम फेरीत दाखल होण्याच्या दृष्टीने पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य भारत ठेवून असेल. आम्ही सुलतान ऑफ जोहोर चषकापूर्वी सर्वोत्तम स्थितीत राहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार सराव केलेला आहे. या वेळी संघात अनेक नवीन खेळाडू आहेत, जे मैदानावर आपली क्षमता प्रदर्शित करण्यास उत्सुक आहेत. सर्व खेळाडू तयारीत सुधारणा करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत. आमचे वेळापत्रक व्यस्त असून मस्कतमध्ये नोव्हेंबरमध्ये होणार असलेल्या पुऊषांच्या कनिष्ठ आशिया चषकाचाही त्यात समावेश आहे, असे उपकर्णधार रोहितने सांगितले.