स्विगीला धक्का, सहसंस्थापक रेड्डीचा राजीनामा
वृत्तसंस्था/मुंबई
फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीला नुकताच एक मोठा धक्का बसला आहे. स्विगीचे सहसंस्थापक लक्ष्मीनंदन रेड्डी यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळामधून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून आगामी काळामध्ये ते वैयक्तिक प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मिळते आहे. अलीकडे स्विगी या कंपनीने आपल्या कार्ययोजनेमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय संचालक मंडळामध्ये घेतला होता. नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली असून नव्याने धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात यामध्ये विचार करण्यात आला होता.
दोघांची निवड
याच दरम्यान कंपनीने 1 जून 2026 पासून सहसंस्थापक फणी कृष्णन व समुहाचे सीएफओ राहुल बोथरा यांना कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राहुल बोथरा हे स्विगीमध्ये नुकतेच सामील झाले असून ते पहिले चिफ फायनान्शिअल ऑफिसर असणार आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेंचा सुमारे दोन दशकांचा अनुभव त्यांना असल्याची माहिती आहे.
स्विगीच्या टार्गेट किमतीत घट
याचदरम्यान रेनन डे कॅस्ट्रो अल्व पिंटो यांचीही संचालक मंडळात निवड करण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्म एचएसबीसी यांनी 25 मार्च रोजी म्हटले होते की, दीर्घ काळात पाहता कृत्रिम बुद्धिमतेमुळे स्पर्धा अधिक व्यापक होणार आहे. क्वीक कॉमर्समधील कंपन्यांसाठी हा कठीण काळ असणार आहे. ब्रोकरेज फर्मने याचदरम्यान स्विगीची टार्गेट प्राइस 300 रुपयांवर घटवली आहे. याआधी ती 380 रुपये होती. आयपीओ प्राइस 390 रुपये इतकी आहे, त्यापेक्षा टार्गेट प्राइस कमीच आहे.