Solapur : चिंचोली येथील सीएनजी पंप अचानक बंद
सोलापुरातील प्रमुख सीएनजी पंप बंद,
सोलापूर : एमआयडीसी चिंचोली परिसरात आयएनसी लिमिटेडतर्फे चालवला जाणारा सोलापुरातील प्रमुख सीएनजी पंप मंगळवारपासून अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.कंपनीने सोमवारीच पंप परिसरात नोटीस फलक लावून २ डिसेंबरपासून पंप बंद राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी या ठिकाणी आलेल्या वाहनधारकांना पंप बंद असल्याचे दिसताच वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.
पंप बंद असल्यामुळे सीएनजी वाहनधारकांना इंधनासाठी भटकंतीकरावी लागत असून शहरात अन्य पर्यायी सुविधा नसल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. चिंचोली येथील पंपावर सीएनजी भरण्यासाठी सतत वाढणारी गर्दी, रांगेत होणारी अरेरावी आणि परिसरातील रहिवाशांच्या तक्रारींमुळे पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चाही होत आहे.
स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंपावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंप सुरू ठेवणे कठीण झाल्याचे समजते. याबाबत कंपनीच्या प्लांट मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता मंगळवारपासून बंद आहे. अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असे सांगितले. पंप पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने सोलापुरातील वाहनधारकांची चिंता वाढली आहे.