Mumbai-Goa Highway: कोकणात CNG Gas चा तुटवडा, हायवेवर वाहनांच्या रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या
चिपळूण : सुट्टी हंगामानिमित्त गावच्या दिशेने येत असलेल्या चाकरमान्यांना सीएनजीच्या तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून विशेष म्हणजे सीएनजी सुरु कधी होणार, हे खुद्द तेथील कर्मचाऱ्यांनाही माहिती नसल्याने परिणामी या रांगामध्ये आणखीनच वाढ होत आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्येही सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा दिसत होत्या.
मे महिन्याच्या सुट्टीच्या हंगामामध्ये मुंबई, पुणे येथील चाकरमानी गावच्या दिशेने येत असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. एकीकडे चाकरमानी कोकणात आले असताना दुसरीकडे त्यांना वाहनामध्ये सीएनजी भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सीएनजीच्या वाढत्या मागणीमुळे सीएनजी काही दिवसातच संपत असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. शनिवारीदेखील यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. चाकरमानी सीएनजी भरण्यासाठी आले असताना संपलेल्या सीएनजीमुळे त्यांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागले. यामुळे शहरातील शिवाजीनगर बसस्थानकापासून त्यापुढे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
रत्नागिरीतही सीएनजी पंपांवर रांगा
जिल्हाभरात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सीएनजी पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. येथील रिक्षाचालक, स्थानिक चारचाकी वाहनधारक, पर्यटक, चाकरमानी अशा सर्वांनाच याचा मोठा फटका बसला असून सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. तर त्यावरून पंपावर शुक्रवारी रात्री रत्नागिरीत स्थानिक रिक्षाधारकांनी संतापही व्यक्त केला.
जिह्यात पंपांवर सीएनजी तुटवड्याची गेल्या 10 दिवसांपासून जिह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. उन्हाळी सुट्टीत गावाकडे येणाऱ्या चाकरमानी तसेच पर्यटनासाठी जिह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही या सीएनजीचा सामना करावा लागत आहे.
ज्यांच्या गाड्या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत, त्यांना पहाटेपासूनच तासन् तास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे रहावे लागत आहे. या सर्व वाहनधारकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे. सर्वच पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे 4 ते 5 तास गॅस मिळवायला वेळ लागत असल्याच्या स्थितीने सारेच हैराण झाले आहेत.