अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करावे...सतेज पाटीलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
जिल्ह्यात कोसळणारा पाऊस आणि परिणामी पूरपरिस्थितीची भिती या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्या यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या संभाव्य परपरिस्थिती लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून होणारे विसर्गाचे योग्य नियोजन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना द्याव्यात असे आपल्या निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच मंत्री एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी.के. शिवकुमार यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.