सरकारच्या कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली! मुख्यमंत्री शिंदे यांची टीका
इस्लामपुरात शासन आपल्या दारी कार्यक्रम : आमचे सरकार फेसबुक लाईव्हचे नाही, प्रत्यक्ष कामातले : विरोधकांकडून बिनकामाचे आरोप : आम्ही कामातून उत्तर देवू : नियमित कर्जदारांना लवकरच 50 हजार
इस्लामपूर प्रतिनिधी
केंद्र व राज्यसरकारने शेतकरी, तऊण, महिला, उद्योजक यांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. डब्बल इंजिन सरकार रात्रंदिवस काम करीत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये देण्यात येतील, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी नोंद घेवून कार्यवाही करावी. सरकारच्या लोकहिताच्या कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असून आम्ही त्यांना कामातूनच उत्तर देवू, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
गुंतवणुकीचे पाच लाख कोटींचे करार
शिंदे पुढे म्हणाले, हे सरकार लोकाभिमुख असून आतापर्यंत सांगली जिल्हयातून 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून 10 महिन्यात या कार्यक्रमातून राज्यातील साडे चार कोटी लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. हे सरकार फेसबुक लाईव्ह चालणारे नसून लोकांच्या दारात जाणारे आहे. शपथ विधीनंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा प्रकल्पाचा निर्णय घेतला. आतापर्यंत 120 सिंचन प्रकल्पातून 15 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. विरोधक उद्योग बाहेरील राज्यात गेल्याचा कांगावा करीत आहेत. आपल्या काळात उद्योग गुंतवणुकीचे 5 लाख कोटींचे करार झाले असून त्यातून तरुणांना रोजगार मिळणार आहे. पाठीमागील सरकार घोटाळेबाज, भ्रष्टाचारी होवून गेले. पण, मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. यावेळी शेतकरी सन्मान, बचतगटांना भांडवल, म. फुले आरोग्य योजना पाच लाखावर या कामांची माहिती दिली. महिलांनी उत्पादीत केलेल्या मालाचे प्रशासनाने ब्रॅण्डींग करावे असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांत झाले नाही इतकी कामे केली, तरूण आणि शेतकऱ्यांसाठी योजना राबवली असेही ते म्हणाले.
यावेळी खा.माने यांनी केंद्र, राज्याच्या लोकहिताच्या योजनांची माहिती देऊन नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर 50 हजार तातडीने देण्याची मागणी केली. स्वागत व प्रास्ताविक पालकमंत्री खाडे यांनी केले. या कार्यक्रमा दरम्यान वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्त यांच्या प्रश्नांचे निवेदन खा.माने व गौरव नायकवडी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. भाषणातच शिंदे यांनी यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेवू, अशी ग्वाही दिली. दरम्यान, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश व चावी वाटप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना
सध्या लोकसभा निवडणूक जागा वाटपाची चर्चा सुरु असून मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टरने चार वाजता आगमन झाले. येथील कार्यक्रम घाईगडबडीत एक तासात उरकण्यात आला. ते तातडीने दिल्लीला जागा वाटपाच्या बैठकीसाठी रवाना झाले. त्यामुळे नेते व उपस्थितांचा भ्रमनिरास झाला. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे अनुपस्थित राहिले.
अण्णासाहेब डांगे अचानक व्यासपीठावर
मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरु असताना जेष्ठ नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे अचानक व्यासपीठावर आगमन झाले. सभा संपल्यानंतर डांगे यांनी शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या कार्यक्रमास ते आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.