मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत मंत्री सिक्वेरांची विचारपूस
पणजी : दिल्लीत इस्पितळात दाखल झालेले पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी भेट घेऊन विचारपूस केली. सिक्वेरा यांच्यावर दिल्लीत खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्री रविवारी दुपारीच गोव्यात परतले. मुख्यमंत्री अचानक मध्यरात्री दिल्लीस जाण्याचे प्रयोजन काय? असे एका स्थानिक नेत्यास विचारले असता, रविवारी दिवसभरात मुख्यमंत्र्यांची अनेक महत्वाची कामे होती, म्हणून ते रात्री गेले व सकाळी सिक्वेरांची विचारपूस करून लगेच गोव्यात परतले, असे सदर नेत्याने सांगितले.
गत कित्येक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाबद्दल सर्वांची उत्सुकता वाढीस लागली आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री दिल्लीस जातात तेव्हा लोकांना ते फेरबदलासाठीच गेले असावेत असेच वाटते. हल्लीच्याच काळात असे प्रकार तब्बल तीन वेळा घडले आहेत. मात्र दरवेळी कधी विवाह सोहळ्यास तर कधी अंतिम दर्शनासाठी गेल्याचे वृत्त समजले होते. शनिवारी त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केल्याचे वृत्त पसरल्यानंतरही लोकांची उत्सुकता पुन्हा एकदा जागृत झाली होती. परंतु त्यांची ही भेटही ‘त्यासंबंधी’ नव्हती असेच सदर नेत्याकडून समजले आहे.