धर्मवीरच्या पहिल्या भागात काही गोष्टी इच्छेविरुद्ध...पण आता आपल्याकडे फुल्ल ऑथोरीटी
पहिल्या भागात काही गोष्टी इच्छेविरूद्ध केल्या पण आता करणार नाही अशी थेट भुमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून चित्रपटाचा मुहुर्त आज पार पडला. यावेळी चित्रपटाच्या सेटवरून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि आणि चित्रपटाच्या कलाकारांशी संवाद साधला.
धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात अप्रत्यक्षरित्या मोठी कामगीरी बजावली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग आणण्यासाठी जोरात तय्यारी सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे गटावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “अगोदरच्या चित्रपटाला (धर्मवारी भाग १) एकुण १७ ते १८ पारितोषिके मिळाली. अभिनेता प्रसाद ओकलाही अभिनयाची विविध पारितोषिके मिळाली. प्रसादला मानलं पाहिजे. प्रवीणने त्याला बरोबर शोधलं. प्रसादचा दिघेसाहेबांशी कधी संपर्क नव्हता, कधी पाहिलंही नव्हतं. तो अंधारात एकदा समोरून आला तेव्हा दिघे साहेबच आल्याचा भास झाला. कोणताही अभिनय करताना जीव ओतून टाकावा लागतो. सर्वस्व अर्पण करावं लागतं. तेव्हा ती भूमिका पूर्ण होते. सिनेमे येतात जातात, पण अभिनय करायचा म्हणून करायचा नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन आले. मराठी सिनेमा गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये बघितला गेला. हा चित्रपट हिंदीत बनवा असंही काही लोकांनी सुचवले. त्यामुळे भाग २ हिंदीतही आला पाहिजे. भाग १ चांगला झाला. सगळ्यांनी मेहनत घेतली, त्यासाठी सगळ्यांचे आभार."असेही ते म्हणाले.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “काही लोकांना धर्मवीर हा सिनेमा खटकला. तर काही लोक सिनेमा बघता बघता उठून गेले. तसेच काही लोकांना काही सीन आवडले नाहीत. पण, आता कोणालाही आवडो ना आवडो फूल फायनल ऑथोरेटी आपण आहोत. पहिल्या भागामध्ये आपल्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या होत्या. त्या गोष्टी प्रविणलाही आवडल्या नव्हत्या. कलाकार लोक मुडी असतात. त्यांना गोड बोलून प्रेमाने सांगावं लागतं. काही लोकांना अजिर्ण झाले असून पण त्यावर एक वर्षांपूर्वीच गोळी दिली आहे.” असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला आहे.