Vithu Mauli: 'तरुण भारत संवाद'च्या 'विठू माऊली' विशेषांकाचे CM फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंकाचे कौतुक केले
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात 'तरुण भारत संवाद'च्या आषाढी वारी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. आषाढ शुद्ध दशमी या दिवशी सायंकाळी 'विठू माऊली' या अंकाचे प्रकाशन पार पडले. पंढरपूर येथील समृद्ध परंपरा, वारसा असलेले मठ, मंदिरे आणि धर्मशाळा यांची सचित्र विशेष माहिती असणारा हा विशेषांक वाचकांसाठी एक पर्वणी ठरेल असाच आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंकाचे कौतुक केले.
प्रकाशनादरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील, 'तरुण भारत संवाद'चे मुख्य संपादक श्रीरंग गायकवाड, सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक, विजयकुमार देशपांडे, विनायक भोसले, उपसंपादक श्रीशैल्य भद्रशेट्टी, पंढरपूर येथील प्रतिनिधी संतोष रणदिवे, चैतन्य उत्पात, विनोद पोतदार हे उपस्थित होते.
अंकाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले विशेषांकातील माहिती अतिशय उपयुक्त व प्रभावी आहे. असे आध्यात्मिक माहिती असलेले अंक प्रकाशित होणे आवश्यक आहे. यातून युवा पिढीला राज्यातील विविध संत, महात्मा यांचे कार्य कळेल. प्रेरणादायी इतिहास, वारकरी संप्रदायाची परंपरा याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल.
यावेळी मुख्य संपादक श्रीरंग गायकवाड यांच्याशी चर्चा करून अल्पावधीत एवढा माहितीपूर्ण अंक कसा प्रकाशित केला? याची विचारणाही त्यांनी केली. यावेळी आ. आवताडे, आ. अभिजीत पाटील यांनी देखील अंकाचे विशेष कौतुक करून 'तरुण भारत' टीमला शुभेच्छा दिल्या.