मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदामंत्री जिल्हा विभाजनास सकारात्मक
माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांची माहिती
चिकोडी : बेळगाव जिह्याचे विभाजन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदा मंत्री सकारात्मक आहेत. लवकरच जिह्यातील आजी-माजी आमदारांची बैठक घेऊन मते जाणून निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी दिली असल्याची माहिती माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली. बेळगाव सुवर्णविधानसौधमधील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा भूभाग असलेला जिल्हा असून 18 विधानसभा मतदारसंघ व जवळपास 48 लाख लोकसंख्या आहे. सीमावर्ती जिल्हा असल्याने शासनाच्या योजना आणि प्रशासकीय सेवा जनतेच्या दारापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रशासकीय पुनर्रचनेची गरज अत्यावश्यक आहे. या मुद्द्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच निवडून आलेले लोकप्रतिनिधी, माजी आमदार व स्थानिक मान्यवरांची बैठक बोलावून जिल्हा विभाजनावर विस्तृत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे सांगितले.