ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिकावर परिणाम
शेतकऱ्यांत चिंता : उत्पादनात घट होण्याची भीती
वार्ताहर/कडोली
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कडोली परिसरातील मसूर, हरभरा, वाटाणा या कडधान्य पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे. कडधान्य पेरणीनंतर प्रारंभी महिन्याभराच्या काळात थंडीचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कडोली परिसरातील मसूर, हरभरा, वाटाणा पिके जोमाने आली होती. यावर्षी थंडीचे प्रमाण अधिक असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. तेव्हा यावर्षी कडधान्य पिकांचे भरघोस उत्पादन होईल, अशी आशा शेतकरी वर्गातून केली जात होती. पण 15 दिवसापूर्वी कडोली परिसरात पावसाने एक दिवसाची हजेरी लावली आणि तेव्हापासून दररोज ढगाळ वातावरण तयार होत आहे. या वातावरणाचा मात्र मसूर, हरभरा, वाटाणा या कडधान्य पिकांना मोठा फटका बसला आहे. कडोली परिसरात आतापर्यंत जवळपास 50 टक्के पीक खराब झाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास कडधान्य पिकांतील उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.