युद्धाचे ढग...
अमेरिका व इराणमधील युद्धविरामामुळे शांतता प्रस्थापित होण्याच्या आशा निर्माण झाल्या असतानाच जगावर आता पुन्हा युद्धाचे ढग दाटलेले दिसतात. यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. शिवाय युद्धात रशियाचीही एन्ट्री झाल्याचे संकेत मिळतात. हे पाहता आगामी काळात आखातात युद्ध भडकण्याचा धोका अधिक गडद झाला आहे.
यंदाचे वर्ष हे संपूर्ण जगासाठी युद्धसंघर्षाचे ठरले आहे. वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे चटके जगाला सहन करावे लागले. इंधन, गॅसटंचाईच्या झळा भारतासह सर्व जगाला सोसाव्या लागल्या. त्यामुळे जवळपास सर्वच देशांचे अर्थकारण कमी-अधिक प्रमाणात विस्कळित झाले. तथापि, मागच्या 17 जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करार झाला आणि संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने भारतासह संपूर्ण जगाला दिलासा मिळाला. परंतु, आता होर्मुझमध्ये पुन्हा युद्धाचा वणवा पेटला आहे. तेथे व्यावसायिक जहाजांना इराणने लक्ष्य केल्याने अमेरिकेने हल्लाबोल सुरू केला आहे. इराणच्या 140 हून अधिक लष्करी ठिकाणांना अमेरिकेने टार्गेट केल्याचे सांगण्यात येते. यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर निशाणा साधल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे अमेरिका आणि इराणकडून परस्परांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दोन देशांतील शस्त्रसंधीचा करार आता संपुष्टात आला, असे म्हणता येईल. स्वाभाविकच उभय देशांमध्ये पुन्हा संवाद आणि राजनैतिक तोडगा निघण्याची शक्मयता सध्या अंधुक दिसते. ‘होर्मुझ ही कोणत्याही देशाची मक्तेदारी नाही. त्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना संरक्षण देऊ,’ अशी भूमिका अमेरिकेने जाहीर केली आहे. तर ‘एकतर्फी करारांचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. शब्द पाळा. अन्यथा, किंमत मोजायला तयार रहा,’ असे उत्तर इराणचे मोहम्मद बाघेर कालीबाफ यांनी दिला आहे. दोन देशांतील स्थिती बिघडत असल्याचेच हे निदर्शक. खरेतर युद्ध ते शांतता हा प्रवास सोपा नाही. त्यासाठी प्रत्येक राष्ट्राने एक पाऊल मागे येणे क्रमप्राप्त असते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत अमेरिका वा इराण यापैकी कुणीही आपला हेका सोडताना दिसत नाही. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून तर सगळ्या जगातील शांततेला नख लागले आहे. आधी युद्ध छेडायचे, मग शांतता निर्माण करायचा देखावा करायचा, कुठले काय करार करायचे आणि पुन्हा युद्धस्थिती कशी तयार होईल, यासाठी प्रयत्न करायचा, हीच त्यांची नीती राहिली आहे. दुसऱ्या बाजूला इराणही आपला हटवादीपणा सोडायला तयार दिसत नाही. अमेरिकेचे नाक दाबण्यासाठी त्यांनी प्राप्त परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय रणनीतिकदृष्ट्या योग्यच. पण, ऊठसूठ होर्मुझवरून तलवार उपसायची, जहाजांना लक्ष्य करायचे, हे काही चांगले लक्षण नाही. याचा फटका इराणलाही बसू शकतो. आधीच अस्थिरतेमुळे या देशात अराजकसदृश स्थिती आहे. त्यात तेथील अर्थकारणही अडचणीत आहे. अशा अवस्थेत युद्धाला आमंत्रण देणे, हा आत्मघातच ठरेल. या युद्धाचा दुसरा भाग म्हणजे त्यातील रशियाची भूमिका. अमेरिका व रशियातील संघर्ष जगाने पाहिला. शीतयुद्धाचा काळ, नंतरची स्थितीही जगाने अनुभवली आहे. मात्र, ट्रम्प व रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमिर पुतीन यांच्यातील मैत्रीमुळे ही दोन राष्ट्रे मध्यंतरी बऱ्यापैकी जवळ आली होती. मात्र, ट्रम्प यांचा लहरी स्वभाव, जागतिक परिस्थितीचा उलटफेर, भारताला रशियाकडून तेल घेण्यापासून रोखण्याची नीती यामुळे त्यामध्ये दरी पडल्याचे दिसते. अशातच रशियाने आपले अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांनीयुक्त विमान इराणमध्ये धाडल्याने अनेकाच्ंया भुवया उंचावल्या आहेत. या माध्यमातून रशिया अप्रत्यक्षपणे युद्धात उतरल्याचे मानले जाते. युद्धाचे ढग दाटून आल्याचेच हे लक्षण. हे वातावरण कधी निवळणार, हेच आता पहायचे.