पुतीन-ट्रम्प बैठकीवर अनिश्चिततेचे ढग
बुडापेस्ट शिखर परिषदेपूर्वी विदेशमंत्र्यांची बैठक टळली
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांच्यात चालू आठवड्यात निर्धारित बैठक आता अनिश्चित काळासाठी टाळण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यादरम्यान बुडापेस्ट येथे प्रस्तावित शिखर परिषदेपूर्वी हे घडल्याने ही चर्चा आता होण्याची चिन्हे धूसर दिसू लागली आहेत. लावरोव आणि रुबियो यांनी यापूर्वी दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या बैठकीसाठी चर्चा केल्याची घोषणा रशियाने सोमवारीच केली होती.
20 ऑक्टोबर रोजी लावरोव आणि रुबियो यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती. 16 ऑक्टोबर रोजी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान निर्माण झालेल्या सहमतीला अंमलात आणण्यासाठी संभाव्य पावलांवर रुबियो आणि लावरोव यांनी चर्चा केली होती. रुबियो यांनी
आगामी बैठकांच्या महत्त्वावर जोर दिला होता. या चर्चेनंतर रशियाने स्वत:ची आक्रमक भूमिका बदलली नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मानणे आहे. दोन्ही विदेश मंत्र्यांदरम्यान युक्रेन वाद शांततेत सोडविण्याच्या पद्धतींवर तीव्र असहमती होती.
पुढील आठवड्यात पुतीन आणि ट्रम्प यांच्या भेटीला पुढे ढकलण्याची शिफारस रुबियो करणार नाहीत, परंतु चालू आठवड्यात रुबियो हे पुन्हा लावरोव यांच्याशी चर्चा करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
16 ऑक्टोबर रोजी फोनवरील चर्चेनंतर ट्रम्प आणि पुतीन हे चालू वर्षातील दुसऱ्या शिखर परिषदेसाठी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये भेटण्यास तयार झाले होते. तर या बैठकीपूर्वी लावरोव आणि रुबियो समन्वय करतील, अशी पुष्टी दोन्ही देशांनी दिली होती. तर ट्रम्प आणि पुतीन हे यापूर्वी ऑगस्ट महिन्यात अलास्काच्या एंकोरेजमध्ये भेटले होते.
हंगेरीसाठी शिखर परिषद महत्त्वपूर्ण
बुडापेस्टमध्ये शांतता शिखर परिषदेचे यश हंगेरीसाठी अत्यंत आवश्यक आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या प्रारंभिक तीन वर्षांमध्ये हंगेरीच्या अर्थव्यवस्थेला मोठा
झटका बसला आहे. गॅस आणि ऊर्जेच्या किमती वाढल्याने महागाई गगनाला भिडली आहे. शांतता प्रस्थापित झाल्यास आमचा देश यूद्धपूर्व आर्थिक वृद्धीच्या रुळावर परतू शकतो असा दावा हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी केला आहे.
झेलेंस्की यांची भूमिका
पुतीन आणि ट्रम्प यांच्यात होणाऱ्या शिखर परिषदेकरता निमंत्रित करण्यात आल्यास मी सहभागी होणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष बुडापेस्ट येथील बैठकीवरून चिंतेत आहेत, कारण हंगेरीचे पंतप्रधान ऑर्बन यांचे रशियासोबत अत्यंत घनिष्ठ संबंध असून युक्रेनबद्दल त्यांची भूमिका नकारात्मक राहिली आहे. ऑर्बन हे रशियाधार्जिणे म्हणून ओळखले जातात.