ढगफुटीचा तडाखा
राजानं मारलं आणि पावसाने झोडपले तर कुणाकडे दाद मागायची. राज्यात गेले तीन चार दिवस पावसाने जो रुद्रावतार धारण केला आहे तो पाहता असा पाऊस जन्मात पाहिला नाही, ही ढगफुटी आणि तिचा तडाखा कधीच कुणाच्या नशिबी नको, असे शब्द कुणाच्याही तोंडी यावेत. काही माणसे अभिमानाने सांगतात, आम्ही इतके पावसाळे बघितले पण असे सांगणारेही सांगतात. आम्ही इतके पावसाळे बघितले पण हा पावसाळा वेगळा आणि परीक्षा घेणारा आहे. कधी पश्चिम महाराष्ट्रात, कधी दक्षिण महाराष्ट्रात, कधी मुंबई तर कधी कोकण, विदर्भात पावसाचा, पूराचा कहर असायचा पण गेले चार दिवस जो पाऊस सुरु आहे. त्याने चांदा ते बांदा उभ्या आडव्या महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. जनजीवन विस्कळीत केले आहे. आभाळ फाटणे म्हणजे काय याची अनूभूती अवघा महाराष्ट्र घेतो आहे. राज्यातील धरणे, तलाव सारे काठोकाठ भरलेले आहेत. अनेक सखल भागात आणि शहरात पाणी तुंबले आहे. मुंबईकर तर अतोनात समस्या सहन करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉररुम निर्माण करुन जनतेला विश्वासात घेत आश्वासित करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. या पावसाने बळीराजाचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. यंदाचा पावसाळा खरीप हंगामाची जणू संक्रांत ठरला आहे. जून, जुलैमध्ये असा बेफाम पाऊस पडला की शेतकऱ्यांना पेरण्यांची संधी मिळाली नाही. उशीरा पेरण्या झाल्या त्या पिकांना अतिवृष्टीमुळे तडाखा बसला. एकुण काय ‘सर्जा कायम कर्जात’ राज्यात सुमारे बारा ते चौदा लाख एकरावरील पिके भुईसपाट झाली आहेत. पिक नुकसान, जमीन नुकसान व पशूधनाला फटका बसला आहे. शासन नुकसानीचे पंचनामे करणार असले तरी त्यासाठी पावसाचा कहर थांबला पाहिजे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण काठोकाठ भरले आहे. राधानगरीची सर्व दारे उघडली आहेत. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात रोज 300 मिमि पावसाची नॉनस्टॉप धुवांधार बॅटिंग सुरु आहे. उजनी फुल्ल झाले आहे. कोयनेतून एक लाख क्युसेक, वारणेतून 50 हजार तर आलमट्टीतून दोन लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांचा संवाद व समन्वय असल्याने सांगली, कोल्हापूर शहरात पाणी घुसणेचा धोका अद्याप कमी झालेला नाही. पण पंचगंगा, वारणा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. पावसाची कोसळधार पाहता आणि कृष्णा वारणा नदीची सध्याची पाणीपातळी व ती वाढण्याचा वेग पाहता उद्या सांगलीत नदीचे पाणी घुसेल अशी भीती व्यक्त होते आहे. महाबळेश्वर, नवजा, चांदोली, प्रचितगड आदी पाणलोट क्षेत्रातील ढगफुटी थांबली तरच या संकटातून वाई, कराड, औदुंबर, सांगली, नरसोबावाडी आणि नदी काठची गावे, शेते वाचतील अन्यथा मोडून पडलेला शेतकरी आणि बाजारपेठ आणखी खोलात रुतेल, अतिवृष्टीने राज्यात अनेक भागात ओला दुष्काळ पडणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. तोंडावर असलेला गणेशोत्सव आणि पाठोपाठ दसरा, दिवाळी याला कसे सामोरे जायचे याची विवंचना सर्वापुढे आ वासून उभी आहे. महापूर आणि तडाखा यामुळे राज्यभरात 21 बळी गेले आहेत, असे प्राथमिक आकडेवारी सांगते आहे. पुरात वाहून जाणे, दरड कोसळून, घर पडून जखमी होणे असे अनेक दुर्दैवी प्रसंग समोर आले आहेत. कोकणात चिपळूण, खेड आणि राजापूरात पूरस्थिती आणि कोसळधारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधूदुर्गात वेगळी अवस्था नाही. विदर्भात पावसाची संततधार सुरु आहे तर मराठवाड्यात पावसाने 11 बळी घेतले आहेत. एकुणच कोसळधाराचा तडाखा न सोसणारा आहे. या अतिवृष्टीमुळे शहरांना अडीअडचणी आणि नुकसान व समस्यांना सामोरे जावे लागले आहे तर ग्रामीण महाराष्ट्र आणि कर्जबाजारी शेतकरी कोसळला आहे. या शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्याने सावरले पाहिजे. राजकीय पक्ष रेवड्या उडवत ठाकरे ब्रॅंड संपला की संपवला या चर्चेत आहेत तर सरावल्या हातांना संधी हवी आहे.
एकुणच, अतिवृष्टी, ढगफुटी, शेतीला तडाखा, आरोग्य धोक्यात, पाणीबाधा, अन्नबाधा या प्रश्नाचे मूळ न शोधता आपण सारे पैशाच्या मागे लागलो आहोत. कोरोना काळात बॅंक बॅलन्स भरपूर आहे पण औषधांची गोळी मिळेना आणि मोठे पॅकेज आहे पण नोकरी गेली इएमआय भरायला पैसा नाही, अशी अनेकांवर वेळ आली, तशी अवस्था कधीही होऊ शकते. काहीही संकट येऊ शकते. या मितीला जगात कोठे ढगफुटी तर कुठे वणवे लागून जंगले खाक झाली आहेत. जगभरात काहीही होऊ शकते. माणसाने चंगळवाद स्विकारुन निसर्गाचा ऱ्हास चालवला आहे. जमीन, पाणी, उन-वारा, प्राणी व जनजीवन वाचवणं हे मोठे आव्हान आहे. ते कोणा एका व्यक्तीचे नाही आणि कुणी यातून मुक्त नाही ही धरा वाचवणे, तिची विविधता जपणे आणि माती, पाणी, हवा यांचे आरोग्य राखणे हे आपल्या पिढीचे सर्वाधिक महत्त्वाचे व आद्य कर्तव्य आहे, तसे झाले नाही तर सारी सृष्टी एका महातडाख्याला सामोरी जाऊन संपेल. सर्वनाश टाळायचा असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे. त्यातच सार्वहित आहे. अन्यथा तडाख्यामागून तडाखे बसणार. आपणच केलेल्या चुकांची ही शिक्षा आहे. महापूरात तातडीने जे
करावे लागणार ते केलेच पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी मोठे आर्थिक सहाय्य केले पाहिजे. पण माणूस म्हणून, विश्व म्हणून ढगफुटी, असह्य तापमान आणि मृदेचे, नद्यांचे बिघडत असलेले आरोग्य यासंदर्भात पावले टाकली पाहिजेत. अन्यथा कोसळधाराचे असे तडाखे बसत राहणार. तातडीने संकटग्रस्तांना मदत व सहाय्य केले पाहिजे. डबल इंजिनची शक्ती दिसली पाहिजे आणि दीर्घकालीन धोरण पण आखले पाहिजे. तूर्त महाराष्ट्र संकटात आहे. हातात हात घेऊन तो सावरला पाहिजे. विकासाची गती घेताना अस्तित्वाची लढाई दुर्लक्षता येणारी नाही याचे भान ठेवले पाहिजे.