सत्तरीत ढगफुटी, 4 इंच पाऊस
वाळवंटीला पूर, परतीच्या पावसाचा दणका : आज रेड अलर्ट, सज्ज राहण्याचा राणे यांचा आदेश
पणजी : परतीच्या पावसाने अखेर गोव्याला दणका देण्यास प्रारंभ केला. सत्तरीच्या डोंगराळ भागात सोमवारी परतीच्या पावसातून ढगफुटी झाली आणि त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्येच 4 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. सांखळीच्या वाळवंटी नदीला पूर आला. मात्र पावसाची तीव्रता सायं. 4 नंतर कमी झाली व पुराचे पाणी शिघ्र गतीने ओसऊ लागले. गोव्याच्या विविध भागात दुपारनंतर सायंकाळपर्यंत मध्यम तथा हलक्या स्वऊपाचा पाऊस झाला. हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला असून आज व उद्या संपूर्ण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सत्तरीमधील संभाव्य पूर लक्षात घेऊन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई उपजिल्हाधिकारी आणि मामलेदारांना सतर्क राहून आवश्यक उपाययोजना आखण्याचे आदेश दिले.
परतीच्या पावसाला गोव्यात रविवारी दमदार सुऊवात झाली. सोमवारी हवामान खात्याने नारंगी अलर्ट जारी केला होता. दुपारच्या दरम्यान सत्तरीत आणि गोव्याच्या आजूबाजूच्या गावात म्हणजे दोडामार्ग तालुका तसेच खानापूर तालुक्यात अक्षरश: ढगफुटी झाली. दुपारी 2 वा. मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. सायं. 4 पर्यंत दोन तासांत 4 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. यंदाच्या पावसाळी मौसमात हा एक सर्वात मोठा विक्रम होता. अंजुणे धरण क्षेत्रातदेखील दोन तासांत 4 इंच पावासाची विक्रमी नोंद झाली.
या मुसळधार पावसामुळे वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर वाढला. केरी व मोर्ले पर्यंतच हा मुसळधार पाऊस होता. सांखळीमध्ये दुपारी 2 वा.पासून सायं. 6 पर्यंत पाऊस पडत होता, मात्र या पावसाची तीव्रता तेवढी जास्त नव्हती. पूर येण्यासाठी तेवढा पाऊस पडत नव्हता. आयी, विर्डी व महाराष्ट्रातील अन्य भागात तसेच सुरल,चोर्ला वगैरे भागात ढगफुटी प्रमाणेच पाऊस कोसळला आणि त्यातून वाळवंटीला जोडणाऱ्या पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढला. अवघ्या दोन तासांत वाळवंटी नदीला एवढा पूर आला की घोटेली - केरी क्र. 2 येथील पुलावऊन वाळवंटीचे पाणी वाहू लागले. केरी, पर्ये, सांखळी आदी भागात पुराचे पाणी पसरले. सायंकाळी 4 वा. ढगफुटी थांबली. एका तासानंतर पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाली. सोमवारी सकाळी वाळवंटीचे पात्र अक्षरश: कोरडे झाल्यासारखी परिस्थिती होती व सायंकाळी वाळवंटीचे लाल पाणी पात्राबाहेर पोहोचले होते. हा देखील एक चमत्कारच होता.
दोन तासात धरणाच्या पाण्याची पातळी वाढली 36 से.मी.नी
दुपारी पडलेल्या पावसाचा जोर एवढा होता की त्यामुळे अंजुणे धरणाच्या पातळीत तब्बल 36 से.मी.नी वाढ झाली. अलिकडच्या काळात ही सर्वाधिक तीव्रतेने वाढलेली पातळी होती. अंजुणे धरण क्षेत्रात 91.96 मीटर एवढे पाणी होते. सायं. 5 पर्यंत दोन तासांमध्ये ते 92.32 मीटर एवढे झाले. अजून 1 मीटर पाणी वाढल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल. दरम्यान, हवामान खात्याने आज रेड अलर्ट घोषित केला असून आज दिवसभरात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला. वीजांच्या गडगडाटासह गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र पावसाचा जोर सत्तरीत वाढणार असल्याने सत्तरीतील विविध भागात आज पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदारांना कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज रहा असा आदेश दिला आहे.