हॉटेल वेळेत बंद करा; अन्यथा दंड भरा
कराड :
अलिकडच्या काळात काही हॉटेलचालकांनी नियमांना हरताळ फासत परमीट रूम बीअरबारसह हॉटेल रात्री एक ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रकार सुरू केला आहे. यातून काही गुन्हे घडण्याची शक्यता गृहित धरून पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह शहर पोलिसांनी कराड शहर, मलकापूर शहर, सैदापूरसह परिसरातील शंभरावर हॉटेलचालकांना गत दोन दिवसात नोटीस बजावल्या आहेत. हॉटेलचालकांना पोलीस ठाण्यात बोलवून प्रत्यक्ष नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अजूनही काही हॉटेलचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
कराड शहरासह परिसरातील गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. रात्रीच्यावेळी अनेक हॉटेल, परमीट रूम बीअरबार येथे शटर लावून अनेक संशयित किंवा काही युवकांचा गोंधळ सुरू असतो. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना माहिती मिळताच त्यांनी गेले आठवडाभर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेलवर नजर ठेवण्याची सूचना केली होती.
आठवडाभरात पोलिसांनी शंभरावर हॉटेल आपली आस्थापनाची वेळ पाळत नसल्याचा अहवाल तयार केला. त्यानुसार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हॉटेलचालकांना नोटीस बजावण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यापुढे जर आस्थापनाची वेळ न पाळता कायद्याचे उल्लंघन केले तर त्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही, असा इशारा अमोल ठाकूर यांनी दिला. हॉटेलचालकांवर अशाप्रकारे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असून काही शिस्तबद्ध हॉटेलचालकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
ठाकूर म्हणाले, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करावा. मात्र वेळेच बंधन पाळणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी वेळेचे बंधन न पाळणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. हॉटेल उशिरापर्यंत सुरू राहिल्यास एखादा गुन्हा घडून हॉटेल मालकही अडचणीत येऊ शकतात. शिवाय जे हॉटेलचालक नियम पाळत आहेत पण त्यांना जाणीवपूर्वक कोणी त्रास देत असेल तरीही त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.