‘शॅक’ रात्री 11 नंतर बंद करा
पर्यटन खात्याचा आदेश जारी : गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
पणजी : गोव्याच्या किनारपट्टीवर असलेल्या शॅकमध्ये रात्री उशिरा होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता पर्यटन खात्याने पावले उचलली असून रात्री 11 वाजता शॅक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. शिवाय शॅकमध्ये वाजवले जाणारे संगीत शॅकपुरतेच मर्यादित ठेवावे, त्याचा आवाज शॅकबाहेर जाऊ नये याची दक्षता घ्यावी, असे शॅक मालकांना बजावण्यात आले आहे. नेमून दिलेली वेळ शॅकवाले पाळत नाहीत. तसेच जोरजोराने संगीत वाजवले जाते. त्याचा त्रास शॅकबाहेरील लोकांना, इतर शॅकना होतो अशा तक्रारी खात्याकडे आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
गोवा सरकारने अर्थात पर्यटन खात्याने शॅक धोरण यापूर्वीच निश्चित केले असले तरी त्याची कार्यवाही होत नाही. गेल्या काही दिवसात शॅकमध्ये रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार घडल्याचे समोर आले. पर्यटकांना मारहाण करणे, मद्यपान करुन बीचवर दंगामस्ती करणे, विनाकारण भांडण करणे असले प्रकार वाढल्याने तसेच अलिकडे हरमल येथे एका स्थानिक युवकाचा खून झाल्यामुळे पर्यटन खात्याची बरीच अवहेलना झाल्याचे दिसून आले. त्यावर उपाय म्हणून रात्री 11 पर्यंतच शॅक चालू ठेवावेत. त्यानंतर ते बंद करावेत असे पर्यटन खात्याने परिपत्रकातून म्हटले आहे. दरम्यान, अबकारी खात्याने काही शॅकना जादा शुल्क घेऊन मध्यरात्री 1 पर्यंत शॅक खुले ठेवण्याचे परवाने दिले असून त्या शॅकवाल्यांनी काय करावे याचा कोणताही खुलासा पर्यटन खात्याने केलेला नाही.