For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Patan News | पाटणकरांच्या आरोग्याशी खेळ! महिनाभरापासून घंटागाड्या गायब; शहरात 'कचरा कोंडी' की आरोग्याचा आणीबाणी?

01:33 PM May 13, 2026 IST | NEETA POTDAR
patan news   पाटणकरांच्या आरोग्याशी खेळ  महिनाभरापासून घंटागाड्या गायब  शहरात  कचरा कोंडी  की आरोग्याचा आणीबाणी
Advertisement

                                   घंटागाडी बंद असल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढिग

Advertisement

पाटण : शहरातील मूलभूतसुविधांबाबत कायमच बोंब असते. पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमच चर्चेत असतो. मात्र गेल्या महिनाभरापासून घंटागाड्या बंद असल्याने घरोघरी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. अनेकांनी हा कचरा शहरातील विविध रस्त्यावर टाकल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग दिसू आले आहेत. त्यातच सलग दोन दिवस पाऊस झाल्याने हा कचरा कुजू लागला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.नगरपंचायतीच्या स्थापना झाल्यानंतर नागरिकांना मूलभूतसुविधा वेळेवर मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र येथील समस्या सोडवण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. शहरात महामार्गाचे काम सुरू असल्याने खोदकाम झाल्याने विस्कळीत झालेला पाणी पुरवठा नागरिक समजू शकतात.

मात्र महिनाभरापासून कोणत्याही प्रभागात घंटागाडी आली नसल्याने घरात कचऱ्याचे ढिग साचले आहे. अशातच काहीजण घरातून बाहेर जाताना गाडीवरून हा कचरा बाहेर नेत असून रस्त्याकडेला टाकून मोकळे होत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते कचरामय झाले आहेत. त्यातच दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने हा कचरा कुजण्यास सुरूवात झाली आहे. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंडई परिसर, केरापूल, मूळगाव पूल, झेंडा चौक, चाफोली रोड, कॉलेज रोड अशा सर्वच ठिकाणी कचरा टाकला असून शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे. यावर नगरपंचायतीतील विरोधी सदस्यांकडूनही आवाज उठवला जात नाही. नागरिकांकडून केवळ सोशल मीडियावर या समस्येबाबत ज्ञान पाजाळले जात असून याचा फटका शहराला बसत आहे.

Advertisement

समस्यांमध्ये वाढच
या गंभीर बाबीकडे नगरपंचायतीने अजूनही गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. शहराला पूर्णवेळ सीईओ नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. तसेच आकृतीबंधाप्रमाणे नगरपंचायतीतील अनेक जागा रिक्त असल्याने शहरातील समस्या सुटण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.