निशाण गडावर चढे
चहू मुलुखात ह्या, चहू मुलुखात ह्या, समयसूचक बांग देती तव रान कोंबडे
स्वैर दऱ्यादऱ्यातून फडके भगवा, स्वार मराठी अटकेपार बागडे
जेथं पुरंदर प्रताप तो रणी राकट रानी तळपती सह्यागिरीची कडे
अन् घडी घडी तेथं भिजले माझे माय मराठी घोंगडे।।1।।’
‘नाही मावळ्यांशिवाय शिवले उरात त्यांच्या चंद्रमौळी झोपडे
आणिक चरावया शकले न रिपुअश्वही पाहुनी तृणपाती भाल्याकडे
चक्षूर्वैसत्यम, सह्याउदरापथी, अडवू पाहती रवीरथाचे घोडे
दरारा असह्या ऐसा परि सह्यादरा तो निद्रिस्त का पडे।।2।।
कुठे मार्कंड थडी शिंकले जरी रणशिंग शिंगोडे
तोच गस्तीवर गळती भळभळा रक्त शिंतोडे
विजिगिषुंचा गाऊनी समरघोष तो रणशार्दुलही रणी पडे
अजेय युगंधर रायरे अजुनी कसे सुटेना हे कोडे।।33।।
दख्खनडगरी, वेणुनगरी पडघम तुताऱ्या, ढमढम वाजती ढोलचौघडे
हे वाण शाहिरी करीत गर्जना ती थाप डफावर पडे
अजूनी धडधडे अंगार मातीत या, रणदुंदुंभी कानी पडे
ऐकता रुद्र शिवाची सिंहगर्जना ती, ते निशाण गडावर चढे।।4।।
एकेक मराठ्या, लाख मराठ्या, सकल मराठ्या,
मर्द मराठ्या नमविशी कधी महिषासुरास
त्या तुज प्रती वज्रमुठी, एकीच्या बळापुढे, एकीच्या बळापुढे
आणिक सांगतो आमची मायमराठी, दिशा मराठी, भाषा मराठी
स्मिता मराठी, अस्मिता मराठी, रस्ता मराठी, शिरस्ता मराठी,
चौक मराठी, शौक मराठी, शाळा मराठी, फळा मराठी,
पुस्तक मराठी, मस्तक मराठी, फलक मराठी, झलक मराठी,
फोर्ट मराठी, कोर्ट मराठी कल्ल मराठी, मल्ल मराठी,
मृदा मराठी, मुद्रा मराठी, काऊल मराठी, पाऊल मराठी,
हे पाऊल मराठी पडेल का हो पुढे पुढे।।5।।
- पी. ओ. पाटील (मु. पो. सुळगा, हिंडलगा)