हवामान बदलाचा पिकांच्या पोषणावर परिणाम
हवामान बदलाचा प्रभाव आता केवळ हवामान आणि तापमानापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. हवेत सातत्याने वाढणारा कार्बन डायऑक्साइड आता आमच्या ताटापर्यंत पोहोचला आहे. नेदरलँडच्या लीडन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या एका अध्ययनातून वातावरणात वाढता कार्बन डायऑक्साइड गहू, भात आणि अन्य प्रमुख पिकांमधून प्रोटीन, झिंक आणि आर्यन सारखे आवश्यक पोषक घटक हिरावत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात सकस आहारही शरीराच्या पोषण गरजा पूर्ण करण्यास अपयशी ठरू शकतो.
हे अध्ययन आंतरराष्ट्रीय नियतकालिक ग्लोबल चेंज बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन भारतासह 15 देशांमध्ये सीओ2 चा वाढता स्तर आणि रोपांवर त्याच्या प्रभावाशी निगडित पूर्वीच्या उपलब्ध अध्ययनांच्या व्यापक विश्लेषणावर आधारित आहे. वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे जमविण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारावर गहू, तांदूळ, बटाटा, टोमॅटो यासारख्या 43 पिकांचे विश्लेषण केले आणि त्यातील 32 पोषक घटकांवर सीओ2चा प्रभाव मोजला आहे. सीओ2 जितका वाढेल, पोषण तितकेच घटणार आहे. सीओ2 चा प्रभाव थेट असल्याचे अध्ययनात स्पष्टपणे समोर आले आहे.
विषारी घटकांचा वाढता धोका
सीओ2 च्या वाढत्या स्तरामुळे पिकांमध्ये शिसे यासारख्या विषारी घटकांचे प्रमाण वाढू शकते याचे संकेत संशोधनात मिळाले आहेत. दीर्घकाळापर्यंत अशा घटकांचे सेवन मानवी आरोग्यासाठी गंभीर संकट निर्माण करू शकते आणि खासकरून मुले आणि गर्भवती महिलांसाठी.
भात-गव्हावर सर्वात मोठे संकट
जगातील मोठी लोकसंख्या खासकरून आशिया आणि आफ्रिकेच्या देशांमध्ये लोक दैनंदिन भोजनासाठी भात अन् गव्हावर निर्भर आहेत. अध्ययनानुसार सीओ2 वाढल्यास या दोन्ही पिकांमध्ये पोषण सर्वात वेगाने खालावते. याचा थेट अर्थ म्हणजे ज्यांचे ताट पूर्वीच मर्यादित आहेत आणि जे कुपोषणाच्या धोक्याला तोंड देत आहेत, त्यांच्यावरच याचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे.