हवामान बदल : गोव्याच्या निसर्गासमोर नवे आव्हान
आज जागतिक हवामान दिवस
गायत्री कुंकळ्येकर/पणजी
दरवर्षी 23 मार्च रोजी ‘जागतिक हवामान दिन’ साजरा केला जातो. हवामानातील बदलांची तीव्रता, त्याचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि त्यावर उपाययोजना याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा गोवासुद्धा आज हवामान बदलाचे परिणाम अधिकाधिक तीव्रतेने अनुभवत आहे. गेल्या काही दशकांमध्ये जगभरात हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवू लागले आहेत आणि त्याला गोव्यालाही अपवाद नाही. एकेकाळी सुंदर आणि संतुलित हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात आता ऋतूंचे स्वरूप बदलताना दिसत आहे. उन्हाळ्यातील तापमानात वाढ, पावसाळ्यातील अनियमितता आणि हिवाळ्याचा कमी होत चाललेला कालावधी ही काही ठळक लक्षणे आहेत.
विशेषत: पावसाच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल चिंताजनक आहे. पूर्वी नियमित आणि समतोल पाऊस पडणाऱ्या गोव्यात आता काही दिवसांतच अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होते, तर काही वेळा पावसाळ्यात लांब खंड पडल्याने जलसाठ्यावर परिणाम होतो. या अस्थिरतेचा परिणाम शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत आहे. भातशेतीसारख्या पारंपरिक पिकांवर याचा थेट परिणाम होत असून उत्पादनात घट दिसून येते.किनारपट्टी भागात हवामान बदलाचे परिणाम अधिक गंभीर स्वरूपात दिसतात. समुद्र पातळी हळूहळू वाढत असल्याने किनारपट्टीची धूप वाढली आहे. अनेक ठिकाणी वाळूचे प्रमाण कमी होणे, समुद्रकिनाऱ्यांची ऊंदी घटणे आणि किनाऱ्याजवळील वस्तीवर धोका निर्माण होणे, ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवरही परिणाम होत असून पारंपरिक जीवनशैली धोक्यात येत आहे.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र हवामानातील अनिश्चितता, उष्णतेत वाढ आणि पर्यावरणीय असंतुलन यामुळे पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरण हेच जर धोक्यात आले, तर त्याचा दीर्घकालीन परिणाम पर्यटन उद्योगावर होऊ शकतो. जैवविविधतेच्या दृष्टीनेही हवामान बदल ही मोठी समस्या ठरत आहे. गोव्याच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींवर तापमानातील बदल, पाण्याची कमतरता आणि अधिवासातील बदल यांचा परिणाम होत आहे. काही प्रजाती स्थलांतर करत आहेत, तर काहींच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे. यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे वाढते प्रदूषण ही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे. वाहनांची संख्या वाढणे, प्लास्टिकचा अतिरेकी वापर, झपाट्याने होणारी बांधकामे आणि हरितक्षेत्रांची घट यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत आहे. याचा थेट परिणाम हवामानावर होत असून तापमानवाढ आणि वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जागतिक हवामान दिन’ केवळ औपचारिकता म्हणून न साजरा करता तो कृतीतून साजरा करण्याची गरज आहे. पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे ही काळाची गरज बनली आहे. ऊर्जा बचत, पाण्याचा योग्य वापर, प्लास्टिकला पर्याय स्वीकारणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि वृक्षारोपण यांसारख्या उपाययोजना प्रत्येकाने आपल्या स्तरावर राबवणे आवश्यक आहे.
सुरक्षित आणि समृद्ध गोवा निर्माण कऊया...
सरकार आणि स्थानिक संस्थांनीही शाश्वत विकासाच्या दृष्टीने ठोस धोरणे राबवण्याची गरज आहे. किनारपट्टी संरक्षण, हरितक्षेत्रांचे संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास हवामान बदलाच्या परिणामांना काही प्रमाणात आळा घालता येऊ शकतो. हवामान बदल ही केवळ भविष्यातील समस्या नसून ती आजच्या वास्तवाचा भाग बनली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. निसर्गाने दिलेल्या संपत्तीचे जतन करणे हे केवळ कर्तव्य नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध गोवा निर्माण करण्याची ही एक सामूहिक जबाबदारी आहे.
भारतीय हवामान विभागाची भूमिका
‘भारतीय हवामान विभाग’ (आयएमडी) ही देशातील हवामानविषयक माहिती देणारी प्रमुख संस्था असून हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तिची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. गोव्यासारख्या किनारपट्टी राज्यात आयएमडीकडून दिले जाणारे अचूक आणि वेळेवर हवामान अंदाज, पावसाचे पूर्वानुमान, चक्रीवादळ आणि अतिवृष्टीबाबतचे इशारे हे प्रशासन आणि नागरिकांसाठी जीवनरक्षक ठरतात. आयएमडी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग आणि समुद्रातील घडामोडींचे सतत निरीक्षण करते. हवामानातील बदलांचे दीर्घकालीन विश्लेषण करून भविष्यातील प्रवृत्तींचा अंदाज बांधण्यातही ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे शेती, मासेमारी, पर्यटन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांना योग्य नियोजन करता येते. विशेषत: मुसळधार पाऊस, पूरस्थिती किंवा चक्रीवादळाचा धोका असताना आयएमडीकडून दिले जाणारे पूर्वसूचना संदेश प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्यास मदत करतात. हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर आयएमडीचे संशोधन, निरीक्षण आणि जनजागृती उपक्रम हे केवळ माहितीपुरते मर्यादित नसून, ते शाश्वत आणि सुरक्षित भविष्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत.