स्वीडनच्या नाटोमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा
तुर्कियेच्या संसदीय समितीचे समर्थन : जनरल असेंबलीची मंजुरी शिल्लक
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोला लवकरच स्वीडनच्या स्वरुपात नवा सदस्य मिळणार आहे. आतापर्यंत तुर्कियेच्या आडकाठीमुळे हे शक्य झाले नव्हते, परंतु याप्रकरणी देखली स्वीडला यश मिळू लागले आहे. तुर्कियेच्या संसदीय समितीने नाटोमधील स्वीडनच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव अध्यक्ष रिसेप तैयप एर्दोगान यांच्या सरकारकडून मांडण्यात आला होता.
स्वीडनसाठी हे मोठे यश असले तरीही त्याचा प्रवास पूर्ण झालेला नाही. आता स्वीडनला तुर्कियेच्या जनरल असेंबलीकडून समर्थनाची अपेक्षा आहे. याकरता एक प्रोटोकॉल असून ही प्रक्रिया कधी सुरू होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. तुर्कियेचे सरकार सुमारे वर्षभरापासून स्वीडनच्या नाटो सदस्यत्वाच्या प्रस्तावावर आक्षेप घेत होते.
स्वीडनला नाटोमध्ये सामील करण्याच्या मोहिमेने सुमारे 6 महिन्यांपूर्वी जोर पकडला होता आणि यात अमेरिकेची भूमिका महत्त्वाची होती. तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान हे स्वीडनच्या नाटो प्रवेशाशी निगडित प्रस्ताव स्वत:च्या नॅशनल असेंबलीत मांडण्यास तयार झाले आहेत. लवकरच हा प्रस्ताव संमत होईल अशी अपेक्षा असल्याचे नाटोच महासचिव जेन स्टोल्टनबर्ग यांनीच म्हटले होते.
लिथुआनियाच्या विल्नियस शहरात जुलैमध्ये झालेल्या नाटो परिषदेदरम्यान स्टोल्टनबर्ग यांनी स्वीडन आणि तुर्कियेच्या नेत्यांसोबत चर्चा केली होती. नाटो सदस्यत्वाच्या बदल्यात स्वीडनकडून तुर्कियेच्या युरोपीय महासंघातील प्रवेशाच्या प्रयत्नांना समर्थन दिले जाणार आहे. स्वीडनला नाटोचे सदस्यत्व मिळण्यापूर्वी तुर्कियेला युरोपीय महासंघाने सदस्यत्व द्यावे अशी मागणी एर्दोगान यांनी केली होती. स्वीडनच्या सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून तुर्किये अमेरिकेवर लढाऊ विमाने देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.