For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेतृत्त्वबदलाचे स्पष्ट संकेत

06:48 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेतृत्त्वबदलाचे स्पष्ट संकेत
Advertisement

उद्या शिवकुमारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ शक्य : सिद्धरामय्यांना राष्ट्रीय राजकारणात आणणार 

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

राज्य काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर हायकमांडने स्पष्ट भूमिका घेतली आहे. अखेर वरिष्ठांच्या सूचनेवरून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शविली असून राज्यात नेतृत्त्वबदल होणार हे निश्चित. गुरुवारी याविषयी चित्र स्पष्ट होणार असून मुख्यमंत्रिपदाची माळ उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे राज्य राजकारणातील घडामोडींकडे देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसश्रेष्ठींनी राज्यसभेद्वारे राष्ट्रीय राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. परंतु, सिद्धरामय्या यांनी सध्या मला याविषयी विचार करण्यासाठी वेळ द्यावा, असे सांगितले. मात्र, वरिष्ठांच्या सूचनेवरून सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रिपद सोडून राष्ट्रीय राजकारणात जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. बहुतेक गुरुवारी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठी सातत्याने दिल्लीवारी करत असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना खूशखबर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते के. सी. वेणुगोपाल व रणदीप सुरजेवाला बेंगळूरला येत असून राज्यातील प्रमुख मंत्री व नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्रिपदाबरोबरच उपमुख्यमंत्रिपदासंदर्भातही यावेळी खलबते होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीतील एआयसीसीचे मुख्यालय असलेल्या इंदिरा भवन येथे दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 4 पर्यंत झालेल्या मॅरेथॉन बैठकीत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी कर्नाटक काँग्रेससंदर्भात अनेक बैठक घेतल्या. वरिष्ठ नेत्यांनी प्रारंभी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. नंतर दोघांसोबत एकत्रित चर्चा केली. चर्चेअंती काँग्रेसश्रेष्ठींनी कर्नाटकातील नेतृत्त्व बदलाबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. हायकमांडच्या सूचनेवरून सोमवारी रात्रीच सिद्धरामय्या, शिवकुमार, काही मंत्री व आमदार दिल्लीला गेले होते.

दिवसभर चाललेल्या बैठक सत्रांमध्ये राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या पलीकडेही चर्चा झाली. मुख्यमंत्री बदलाबाबत काँग्रेस हायकमांडने  स्पष्ट निर्णय घेत. सिद्धरामय्यांना पद सोडण्याची सूचना दिली. राज्यसभा सदस्यत्वाबरोबरच पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिल्याचे समजते. दरम्यान, मंत्रिमंडळ पुनर्रचनेला हायकमांडने कोणताही निर्णय घेतला नाही. हायकमांडसोबत झालेल्या चर्चेवर सिद्धरामय्या किंवा डी. के. शिवकुमार या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी निकटवर्तीय मंत्री व आमदारांसोबत अनौपचारिक बैठक घेतली. यावेळी त्यांनी राजीनामा देणे अपरिहार्य असल्याचे बोलून दाखविल्याचे समजते.

एकजूट राखण्याचा कानमंत्र

नेतृत्त्व बदलावरून मागील सहा महिन्यांपासून अनेक संभ्रम निर्माण झाले होते. 202 च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी ही चांगली घडामोड नाही. याविषयी राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोघांसोबत झालेल्या बैठकीत उभय नेत्यांना एकजूट राखण्याचा सल्लाही दिला आहे. पुढील निवडणूक तुम्हा दोघांच्या नेतृत्त्वाखालीच व्हायला हव्यात. त्यामुळे दोघांनी एकत्र राहणे अपरिहार्य आहे, असा कानमंत्र वरिष्ठांनी दिल्याचे समजते.

दिल्लीला गेलेले मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. परमेश्वर यांच्यासह काही मंत्री तसेच 15 हून अधिक आमदारही सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी दिल्लीत कोणाकोणाची भेट घेतली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले हे स्पष्ट आहे.

सिद्धरामय्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव...

सुमारे सहा तास चाललेल्या बैठकीनंतर वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सर्व संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. परंतु, पक्षश्रेष्ठींनी दिलेला अंतिम संदेश काय, हे लवकरच स्पष्ट होईल.

फक्त निवडणुकीवर : वेणुगोपाल

एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केवळ आगामी विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाली. फक्त उमेदवारांची निवड आणि निवडणूक रणनीती यावरच चर्चा झाली. निवडणुकीच्या मुद्द्याव्यतिरिक्त आम्ही इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा केली नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांमध्ये पसरवले जात असलेले आणि राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले इतर सर्व मुद्दे केवळ अफवा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

चार उपमुख्यमंत्रिपदे शक्य

राज्यात मुख्यमंत्री बदलावर तोडगा काढण्यात आला असला तरी चार उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केली जाणार असल्याचे समजते. लिंगायत, दलित, ओबीसी (इतर मागासवर्ग) आणि अल्पसंख्याक समुदायातील आमदारांना उपमुख्यमंत्री बनविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दलित समुदायातून गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, लिंगायत समुदायातून मंत्री एम. बी. पाटील, अल्पसंख्याक समुदायातून मंत्री जमीर अहमद खान आणि ओबीसीतून आमदार यतिंद्र सिद्धरामय्या यांना उपमुख्यमंत्री बनविले जाण्याची शक्यता आहे.

मंत्री जारकीहोळींना प्रदेशाध्यक्षपद?

2028 मध्ये मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे वक्तव्य केलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपदी नेमण्याची शक्यताही नाकारता येत नाही. डी. के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच काँग्रेसचे प्रदेशध्यक्षपद आहे. शिवकुमार मुख्यमंत्री बनल्यास त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागू शकते. त्यामुळे ही जबाबदारी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :

.