स्वच्छतेची क्रांती
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा प्रथम स्थान पटकावून स्वच्छता कार्यक्रमातील आपले सातत्य दाखवून दिले आहे. स्वच्छता हा एक अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. आपले शहर, गाव व परिसर स्वच्छ असेल, तरच तेथील रहिवाशांचे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता असते. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन काही शहरे खरोखरच स्वच्छतेच्या पातळीवर अतिशय प्रभावी काम करीत आहेत. किंबहुना त्यामध्ये प्रथम स्थान मिळवलेले ‘इंदूर मॉडेल’ हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. व्यापक प्रयत्न, सूत्रबद्ध अन् शिस्तबद्ध धोरण व लोकसहभाग ही या मॉडेलची वैशिष्ट्यो आहेत. घनकचरा व्यवस्थापन, जनजागृती, तंत्रज्ञानाचा वापर, नियमांचे काटेकोर पालन व प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयवादी दृष्टीकोन यामुळेच इंदूरने येथवर मजल मारली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मुळात इतर शहरे व इंदूर महापालिकेच्या कार्यपद्धतीत फरक आहे. इंदूरमध्ये सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळा कचरा उचलण्यात येतो. वास्तविक किमान रोज सकाळी कचरा संकलन होणे अपेक्षित असते. परंतु, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमितपणाने कचरा उचलला जात नसल्याचीही उदाहरणे सापडतात. यातून कचऱ्याचे ढीग तयार होतातच. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनाची साखळीही विस्कळीत होते. ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे, हा कचरा संकलनातील महत्त्वाचा भाग मानला जातो. परंतु, बऱ्याचदा याचे पालन होताना दिसत नाही. कचऱ्याची अशी विभागणी करण्यास नागरिक टाळाटाळ करतात. तर याबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासनही उदासीन दिसते. परिणामी ओल्या व सुक्या कचऱ्याचे एकत्रिकरण होते व पुढच्या प्रक्रियांमध्येही बाधा उत्पन्न होतात. इंदूरसारख्या शहरात मात्र या सर्व गोष्टींना फाटा देण्यात आला. प्रशासन व नागरिकांनी परस्पर सहकार्यातून अतिशय शिस्तबद्धपणे कचरा विलगीकरणाचा कार्यक्रम राबविल्याचे दिसून येते. 800 ते एक हजार वाहने, दहा हजारहून अधिक स्वच्छता कर्मचारी यांनाही याचे श्रेय द्यावे लागेल. या सर्वांनी जीव ओतून काम केल्यानेच इंदूरने स्वच्छतेत क्रांती घडवून आणली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. अनेक शहरांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या सार्वजनिक कचरा कुंड्या, त्याभोवती घुटमळणारी भटकी कुत्री व इतर प्राणी असे चित्र पहायला मिळते. यातून रोगराई पसरण्याचा किती धोका असतो, हे वेगळे सांगायला नको. इंदूरने शून्य कचराकुंडी ही संकल्पना राबवत या साऱ्यापासून शहराला दूर ठेवले. तिथे रोजच्या रोज लोकांच्या दरवाजापर्यंत जाऊन कचरा उचलला जातो. कोणत्याही गोष्टीला चळवळीचे रूप द्यायचे असेल, तर जनजागृतीशिवाय पर्याय नसतो. इंदूरमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’सारख्या अभियानातून व्यापक प्रमाणात हे जनजागरण करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, व्यापारी वर्ग, नागरिक अशा सर्वच घटकांना यामध्ये सामावून घेण्यात आले. स्वाभाविकच स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, ही मानसिकता सर्वांमध्ये निर्माण झाली व त्यातूनच इंदूर शहर कचरामुक्त होऊ शकले. आधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे, नदी, तलावांचे पुनऊज्जीवन, सक्षम सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, प्रत्येक विभागासाठी नोडल ऑफिसर, स्वच्छ इंदूर अॅप, नियमित सर्वेक्षण, रिअल टाइम मॉनिटरिंग, पारदर्शक व गतिमान कारभार व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेकविध पातळ्यांवर या शहरात काम झाले. त्याचेच हे फळ म्हटले पाहिजे. मागच्या वर्षी इंदूर व सुरत या दोन्ही शहरांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला होता. या खेपेला सुरत दुसऱ्या क्रमांकावर घसरले. स्वच्छतेमध्ये केवळ अतिउत्साह कामाचा नसतो. तर त्यामध्ये दृढसंकल्प महत्त्वाचा असतो, याचाच हा नमुना. महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरे, तर आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरानेही चौथा क्रमांक मिळविला आहे. हेही कौतुकास्पद होय. तर स्वच्छ भारत अभियानात पिंपरी चिंचवड व पुणे या शहरांनी देशात अनुक्रमे सातवा व आठवा क्रमांक मिळविला आहे. पुण्याची कामगिरी एका क्रमांकाने सुधारली असली, तरी सुधारणेला बराच वाव आहे, असे म्हणता येईल. पुण्यातील नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. मुळा व मुठा नद्यांना गटाराचे स्वऊप प्राप्त झाले आहे. सांडपाणी प्रक्रिया करण्यात शहर अजूनही कोसो दूर आहे. हे पाहता या आघाडीवर अधिकचे काम होणे आवश्यक ठरते. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची कामगिरीही सरसच. राज्यात प्रथम क्रमांक मिळवून शहराने पुढचे पाऊल टाकले आहे. हाच सिलसिला शहर कायम ठेवेल, असा विश्वास वाटतो. याशिवाय महाराष्ट्रातील तसेच देशातील अन्य शहरांमध्येही स्वच्छतेच्या पातळीवर धोरणीपणाने पावले टाकली जात आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. मुळात स्वच्छता हा एका दिवसाचा विषय नाही. ते एक दीर्घकालीन मिशन आहे अथवा असायला हवे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत स्वच्छतेला महत्त्वाचे स्थान आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. गाडगेबाबा स्वत: हातात झाडू घेऊन लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगत असत. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता प्रसिद्ध आहे. ‘ग्रामस्वच्छता’ हा या ग्रंथाचा गाभा आहे. यातून स्वच्छतेचा संस्कार खेडोपाडी पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. लोकसंख्येत देशाने चीनलाही मागे टाकले आहे. अति नागरीकरणाने प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. कचऱ्याच्या समस्येने शहरांच्या व जनतेच्या आरोग्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी संतांचा विचार प्रमाण मानूस प्रत्येकाने स्वच्छता अभियानाचा भाग बनणे, हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य ठरते. मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई यांच्यासह देशातील अनेक महानगरे बकाल झाली आहेत. पायाभूत सुविधांवरही मोठा ताण आला आहे. शहर नियोजन ढासळल्याने अनेक शहरांचे भवितव्यच धोक्यात आले आहे. भविष्यात हे प्रश्न अधिक जटील होऊ शकतात. म्हणूनच स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकाला जपावाच लागेल. स्वच्छता राखली, तरच ‘निरोगी नगरे, निरोगी नागरिक’ ही संकल्पना पूर्णत्वाला येईल.