सावंतवाडी शहरात स्वच्छतेचा उडाला बोजवारा
शहराची दुर्दशा मुख्याधिकाऱ्यांनी पाहावी ; संजु शिरोडकर यांचे आवाहन
सावंतवाडी
सावंतवाडी शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नगरपालिकेचे सफाई कर्मचारी गेले दोन ते तीन दिवस कचरा उचलण्यासाठी आले नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे निदर्शनास येत आहे . सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे हे पालिकेतील केबिन मध्ये बसूनच प्रशासनाचा सर्व कारभार हाकत आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून स्वतः शहरात फिरून शहराची काय दुर्दशा झाली आहे ते बघावे . तसेच सामाजिक संस्था आणि नागरिकांची मदत घेऊन शहराची स्वच्छता करावी असे आवाहन भाजप प्रवक्ते संजु शिरोडकर यांनी केले आहे. तसेच सावंतवाडी शहराच्या दुर्दशेला मुख्याधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप करीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .
नुकताच सावंतवाडी शहरात मिनी महोत्सव पार पडला. हा मिनी महोत्सव झाला त्या समोरील मोती तलावात प्लास्टिक बाटल्यांचा खच पडलेला आहे. तो देखील प्रशासनाने साफ केला नाही. तशा परिस्थितीतच महोत्सव पार पाडला म्हणजे सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण पाहू शकता. सावंतवाडी शहरात पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. ही दुर्दशा बघून सुंदरवाडी म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडी शहराची कचऱ्याचे शहर अशी एक वेगळी ओळख पर्यटकांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी सावंतवाडी शहरात फिरून जे कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे ते सुधारावे अशी मागणी भाजप प्रवक्ते संजू शिरोडकर यांनी केली आहे.