For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत सांडपाणी निचरा व्यवस्थेची स्वच्छता सुरु

04:07 PM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजीत सांडपाणी निचरा व्यवस्थेची स्वच्छता सुरु
Advertisement

सांडपाणी पायाभूत विकास महामंडळ अध्यक्षांची माहिती : 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार

Advertisement

पणजी : दरवर्षी पावसाळ्यात पणजीकरांची डोकेदुखी ठरून अनेक ठिकाणी पाणी साचते. विशेषत: पाटो या मुख्य व्यावसायिक परिसरात पाणी साचते. त्यामुळे यंदा या समस्येची दखल घेऊन खबरदारी घेण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मान्सूनला सुरूवात होण्यापूर्वी, काही दिवसांत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश कंत्राटदार आणि अभियंत्यांना देण्यात आले आहेत. मुख्य नाले आणि भूमिगत वाहिन्यांमधील गाळ उपसण्याचे काम पूर्ण झाल्याने पाण्याचा निचरा वेगाने होईल, अशी माहिती गोवा सांडपाणी पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी काल रविवारी दिली.

मान्सून तोंडावर आल्याने सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहनांच्या  सद्य:स्थितीविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आमोणकर बोलत होते. आमोणकर म्हणाले, यंदाच्या पावसाळ्यात पाटो आणि पणजी शहरात पाणी साचणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यापुढे पणजी आणि पाटो परिसरात उभारल्या जाणाऱ्या सर्व नवीन आणि मोठ्या निवासी तसेच व्यावसायिक इमारतींना स्वत:चा स्वतंत्र मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही, असेही आमोणकर यांनी स्पष्ट केले. पाटो प्लाझासारख्या गजबजलेल्या व्यावसायिक केंद्रात आपत्कालीन स्थितीत पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त हायपॉवर पंप तैनात केले जाणार असून, 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे, असेही संकल्प आमोणकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.