कॅन्टोन्मेंटकडून जिजामाता सर्कल येथील नाल्याची सफाई
प्लास्टिक कचऱ्याचे मोठे आव्हान
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने मंगळवारी जिजामाता सर्कल फोर्ट रोड येथील नाल्यांची सफाई करण्यात आली. जेसीबी व डंपरच्या साहाय्याने सर्व कचरा बाहेर काढण्यात आला. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचला होता. हा कचरा मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूने वाहत येत असून थेट जिजामाता सर्कल येथे अडकत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी जिजामाता सर्कल येथे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे लहान पावसातही गुडघाभर पावसाचे पाणी थांबत असल्याचे दिसून येत आहे. हा नाला 6 फूट खोल असून त्यावर कायमस्वरुपी काँक्रीटचा स्लॅब टाकलेला असल्याने या नाल्याची स्वच्छता करण्याचे मोठे आव्हान कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांसमोर होते.
नाल्याची रुंदी केवळ 3 फूट असल्याने जेसीबीच्या सहाय्याने मर्यादित जागेत नाल्याची सफाई करावी लागली. यामुळे नाले सफाईस विलंब होत आहे. हा नाला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येत असल्यामुळे या नाल्यावरील 12 फूट कायमस्वरुपी काँक्रीटचे आवरण काढून टाकल्यास जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करणे सोयीचे होणार असल्याचे कॅन्टोन्मेंटचे म्हणणे आहे. सध्या नाल्यामध्ये अडकलेले प्लास्टिक पाहता नाल्याची पूर्ण सफाई करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. मोठ्या पावसाच्या अगोदर नाले सफाई झाली नाही तर यावर्षीही जिजामाता सर्कल परिसरात पाणी साचण्याची शक्यता आहे. या परिसरात अनेक वाहन तसेच रेस्टॉरंट व्यवसाय आहेत. बऱ्याच दुकानदारांकडून प्लास्टिकचा कचरा थेट नाल्यामध्ये टाकला जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी आपली उपकरणे उपलब्ध करून देत या नाल्याची सफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.