For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीवनदायिनी नद्यांची लोकसहभागातून स्वच्छता

10:39 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीवनदायिनी नद्यांची लोकसहभागातून स्वच्छता
Advertisement

मलप्रभा-मुंगेत्री नदी परिसरात मोहीम : सहा ट्रॅक्टर-एक ट्रक कचऱ्याचे निर्मूलन

Advertisement

बेळगाव : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून बेळगाव व खानापूर तालुक्यातील स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांकडून खानापूर तालुक्याची जीवनदायिनी मलप्रभा नदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मलप्रभा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत येणाऱ्या गावांच्या नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यातून सहा ट्रॅक्टर व एक ट्रक कचरा गोळा करून तुरमुरी येथील कचरा डेपोकडे धाडण्यात आला. नद्यांच्या वाढत्या प्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी शुक्रवारी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून, यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. ज्या नदीच्या पाण्यावर शेकडो एकर शेती फुलविली जाते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जातो, ती नदी आज प्रदूषणामुळे धोक्यात आली आहे.

असोगा येथील मलप्रभा नदी पात्राची स्वच्छता

Advertisement

जागतिक जलदिनाचे औचित्य साधून भ्रष्टाचार निर्मूलन परिवार, खानापूर लायन्स क्लब, इनरव्हील क्लब खानापूर, खानापूर बार असोसिएशन, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, क्षत्रिय मराठा परिषद, व्यापारी संघटना यांच्यासह इतरांनी रामलिंग देवस्थान असोगा येथील मलप्रभा नदीच्या पात्राची स्वच्छता केली. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, अमृत चरंतीमठ, कॅ. नितीन धोंड, अॅड. नीता पोतदार, सुनीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, किरण गावडे, सचिन राऊत भरतेश शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, हुंचेनट्टी, खादरवाडी, पिरनवाडी येथील नागरिकांनी संतिबस्तवाडजवळील मुंगेत्री नदी परिसरातील कचरा जमा केला.

खानापुरातील कचरा तुरमुरी डेपोत

खानापूर तालुक्यात जमा झालेला हा कचरा बेळगावच्या तुरमुरी कचरा डेपोत येथे आणण्यात आला. आणतेवेळी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. नदीला पूज्यस्थानी मानले जाते. तसेच मलप्रभा नदीच्या घाटांवर विविध धार्मिक कार्ये केली जातात. परंतु, नदीमध्ये प्लास्टिकचा कचरा, जीर्ण कपडे, देवतांच्या प्रतिमा, पूजेचे साहित्य, निर्माल्य, अस्थी विसर्जित केल्या जातात. यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

सहा ट्रॅक्टर कचरा जमा

बेळगाव व खानापूर तालुक्यातील नागरिकांनी एकत्रितरीत्या राबविलेल्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तब्बल सहा ट्रॅक्टर व एक ट्रक भरेल इतका कचरा जमा करण्यात आला. नदीघाट स्वच्छ झाल्याने या मोहिमेत सहभागी झालेल्यांना एक वेगळाच आत्मिक आनंद मिळाला.

Advertisement
Tags :

.