कपिलेश्वर विसर्जन तलावाची स्वच्छता
दूषित पाणी काढले बाहेर
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या तयारीला वेग आला आहे. मनपा प्रशासनातर्फे शहरातील गणेशमूर्ती विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. कपिलेश्वर मंदिर येथील तलावाची रविवारी स्वच्छता करण्यात आली. शहरात 380 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्याबरोबर अलीकडे घरगुती गणेश मूर्तींची संख्याही लक्षणीय वाढली आहे. या गणेश मूर्तींचे विसर्जन तलावातून केले जाते. कपिलेश्वर तलाव, जुने बेळगाव, अनगोळ, जक्कीनहोंडा आदी ठिकाणी असलेल्या तलावातून श्री मूर्तींचे विसर्जन होते. विशेषत: जक्कीनहोंडा येथील तलावामध्ये घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन अधिक होते. कपिलेश्वर विसर्जन तलावातील दूषित पाणी मोटर इंजिनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. शिवाय तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच तलावात नवीन पाणी भरले जाणार आहे. गणेशोत्सव काळात दीड दिवस, सात दिवस आणि 11 दिवसांच्या गणेश मूर्तीही मोठ्या प्रमाणात विसर्जित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर मनपातर्फे तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. तलावातील दूषित पाणी बाहेर काढून त्यामध्ये नवीन पाणी भरण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी शहरातील सर्वच विसर्जन तलाव सज्ज केले जात आहेत.
निर्माल्य विसर्जन कुंडांची गरज
शहरात विसर्जन तलावांबरोबरच ठिकठिकाणी निर्माल्य विसर्जन कुंडांची गरज व्यक्त होत आहे. गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य रस्त्यावर टाकले जाते. त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. तसेच तलावात निर्माल्य टाकले जात असल्याने जल प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे निर्माल्य कुंडांची गरज व्यक्त होत आहे.