For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलप्रभेतील कचरा-घाण काढून नदीपात्र स्वच्छ करा

10:25 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मलप्रभेतील कचरा घाण काढून नदीपात्र स्वच्छ करा
Advertisement

नागरिकांतून मागणी : बंधाऱ्याच्या ठिकाणी पात्र खोली करण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : वेळीच कार्यवाहीची गरज

Advertisement

खानापूर : गेल्या दोन-तीन दिवसापासून जांबोटी पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीचे पात्र प्रवाहित झाल्याचे समजते. मात्र खानापूर येथील मलप्रभा नदीपात्र अद्याप कोरडे असून येत्या दोन दिवसात पुन्हा मोठ्याने पाऊस झाल्यास हे पात्र वाहते होणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी नदीपात्रात साचलेली घाण आणि कचरा जेसीबीच्या सहाय्याने तातडीने काढून नदीपात्र स्वच्छ करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. खानापूर येथील जुन्या पुलाजवळ तत्कालीन कै. माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वीपासून या बंधाऱ्यात पाणी अडवण्यास सुरुवात करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षात पाणी अडवल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा तयार झाला असून या वाळूसाठ्यात दगड-गोटे आणि इतर कचरा साचल्याने बंधाऱ्याच्या पाणी अडवण्याच्या ठिकाणी पात्राची खोलीच कमी झाली आहे. याबाबत शहरातील नागरिकांनी नवीन बंधाऱ्यापासून ते जॅकवेलपर्यंत नदीपात्र खोली करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे खानापूर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी साफ दुर्लक्ष केल्याने नदीपात्राच्या खोलीचे काम रखडले आहे.

कचरा-घाण साचल्याने नदीपात्र दूषित

Advertisement

यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बंधाऱ्यातून पाणी अडवण्यात येते. यंदा योग्य प्रमाणात पावसाळा झाल्यास हे पाणी पुढील मे महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे गाळ काढणे अशक्य होणार आहे. यावर्षी पाणी अडवल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची साठवणूक कमी होणार आहे. त्यामुळे योग्य क्षमतेने पाणीसाठा होणार नाही. यावर्षी नदीपात्र पूर्ण कोरडे झाल्याने वाळू काढून पात्राची खोली वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच नदीपात्रात दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचलेली आहे. त्यामुळे नदीपात्र दूषित झाले आहे. येत्या दोन दिवसात नदीपात्रात पाणी येण्याच्या अगोदर जेसीबी लावून ही घाण पात्राबाहेर काढणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायतीने तातडीने क्रम घेऊन निदान ही साठलेली घाण आणि कचरा तरी बाहेर काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दूरदृष्टिकोनचा अभाव

सुस्त प्रशासन आणि झोपलेले नगरसेवक आणि समाजातील गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्याबाबत दुर्लक्ष होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक समस्या तशाच खोळंबल्या आहेत. शहरासह तालुक्याच्या विकासाबाबत दूरदृष्टिकोन नसल्याने विकास आणि समस्या सोडवण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होत असून तालुक्यातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नदीपात्र वाहते होण्यापूर्वी खोली वाढवण्याची गरज

यावर्षीही आता पावसाळा तोंडावर आल्याने नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम अशक्य झाले आहे. मागीलवर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने डिसेंबरमध्येच नदीपात्र कोरडे पडले होते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हे काम हाती घेणे गरजेचे होते. याबाबत नागरिकांतून वेळोवेळी मागणी झाली होती. मात्र याकडे नगरपंचायतीच्या प्रशासकानी आणि नगरसेवक तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हे काम झालेले नाही. आता येत्या चार-पाच दिवसात नदीचे पात्र वाहते होणार आहे. त्यामुळे आता मात्र खोलीचे काम होणे शक्य नाही

Advertisement
Tags :

.