क्लाऊड आल्वारिसनी दिशाभूल करण्यापेक्षा थेट चर्चेसाठी यावे
पणजी : तमनार प्रकल्प राज्यात आणण्यासाठी 2014 पासून सर्व सोपस्कार पार पाडले जात आहेत. 2018 मध्ये न्यायालयानेही या प्रकल्पासाठी हिरवा बावटा दाखवला. त्यानंतर आता सुमारे सहा वर्षानंतर क्लाऊड आल्व]िरस यांना तमनार प्रकल्पात त्रुटी जाणवू लागल्या आहेत. त्यांनी चुकीची विधाने करण्यापेक्षा वीज भवनात तमनार प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी यावे, असे खुले आव्हान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आल्वारिस यांना दिले आहे. आल्वारिस यांनी तमनार प्रकल्पाविषयी केलेल्या विधानांचा समाचार काल सोमवारी मंत्री ढवळीकर यांनी पर्वरी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस उपस्थित होते.
ढवळीकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला तमनार हा वीज प्रकल्प आता अंतिम टप्यात आला असून, येत्या दोन महिन्यात तमनार प्रकल्प पूर्णत: सुरू होऊन राज्याला वीज पुरवठ्याची सेवा देणार आहे. आल्वारिस यांनी अभ्यास न करता चुकीची विधाने केलेली आहेत. हा केवळ राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम करण्याचा डाव आहे. असले गलिच्छ प्रकार आल्वारिस यांनी थांबवावेत, असेही ढवळीकर म्हणाले.
लोकांनी वीज वाहिन्यांजवळून जाऊ नये
वीज वाहिन्यांच्या 60 मीटर परिसरात लोकांनी वीजवाहिन्यांजवळून जाऊ नये, किंवा त्यांना स्पर्श करू नये, असे आवाहन वीजमंत्री ढवळीकर यांनी केले. तमनार प्रकल्पासाठी ज्या लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांनी मुख्य वीज अभियंते किंवा आपल्याकडे संपर्क साधावा, त्यांना नक्कीच मदत केली जाईल, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक वाहनांबाबत तक्रारी आल्यास अवश्य सोडवू
राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी अनुदान स्वऊपात प्रोत्साहन दिलेले आहे. परंतु काही ठिकाणी नवीन खरेदी केलेली ही वाहने बंद पडत असल्याचे बोलले जाते. मात्र याबाबत पोलिसात किंवा सरकारकडे कुणीही कोणत्याही प्रकारची रितसर तक्रार दाखल केलेली नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या समस्यांबाबत काही तक्रारी असल्यास, त्या आपल्याकडे रितसर आल्यास आपण याबाबत कंपनीला जाब विचारू. समस्या सोडविणे कंपनीची जबाबदारी आहे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.